ठेंगोड्याची गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध
By admin | Published: July 30, 2015 11:14 PM2015-07-30T23:14:07+5:302015-07-30T23:14:07+5:30
सीईओंना निवेदन, खासदारांनी दिशाभूल केल्याचा आरोप
Next
स ईओंना निवेदन, खासदारांनी दिशाभूल केल्याचा आरोपनाशिक : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील गायरान जमीन सटाणा नगरपालिकेसाठी साठवण बंधारा बांधण्यासाठी देण्यास ठेंगोडा ग्रामसभेने आणि ग्रामस्थांनीही विरोध केला असून ही गायरान जमीन साठवण बंधार्यासाठी देऊ नये अन्यथा ठेंगोडा ग्रामस्थ आंदोलन करतील,असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची दिशाभूल करून त्यांना ठेंगोडा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली गट नं-६६३ व ६७२ ही जमीन सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी साठवण बंधारा बांधण्यास देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे पाठविला आहे. वास्तविक ठेंगोडा ग्रामपंचायतीने या प्रस्तावाला विरोध केला आहे. प्रस्तावित ६६३ व ६७२ गटनंबरच्या गायरान जमिनीलगतच सामाजिक वनीकरणाची जमीन असून तेथे २० ते २५ वर्षे जुने वृक्ष आहेत. या जागेऐवजी अस्तित्वात असलेला जुना पाझर तलाव ज्याची लांबी ६२० मीटर असून धरणाची उंची ११ मीटर आहे. तसेच सांडव्याची लांबी ७५ मीटर आहे. या पाझर तलावाची साठवण क्षमता मोठी असून या पाझर तलावाचे साठवण बंधार्यात रूपांतर झाल्यास शासनाच्या मोेठ्या प्रमाणात निधीची बचत होणार आहे. यालगतच सुळे डावा कालवा आलेला आहे. त्यामुळे बंधार्याला पाणी राहील. तसेच या जागेवर इंदिरा आवास योजनेसाठी जागा देण्याचा ग्रामसभेचा ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. गावाकडे विकासासाठी कोणतीही जमीन शिल्लक राहिलेली नाही. तरी सदर जमीन साठवण बंधार्यास देऊ नये, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भास्कर साखरे, गोवर्धन तांदळे, राजेंद्र पवार, मधुकर व्यवहारे, दादाजी अहिरे, चंद्रकांत कोेठावदे, जिभाऊ पवार, संजय बत्तासे, लक्ष्मण पगार, मोतीराम चौधरी, विजयकुमार जोशी, नंदकिशोर चौधरी यांच्यासह ग्रामस्थांची नावे आहेत. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)