तिरंग्याची कल्पना मांडणा-या पिंगाली वेंकय्यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

By Admin | Published: August 2, 2016 10:49 AM2016-08-02T10:49:16+5:302016-08-02T23:05:58+5:30

भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज (२ ऑगस्ट) जन्मदिन.

Respect for birth anniversary of Pingali Venkayya of Tricolor idea | तिरंग्याची कल्पना मांडणा-या पिंगाली वेंकय्यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

तिरंग्याची कल्पना मांडणा-या पिंगाली वेंकय्यांना जन्मदिनानिमित्त आदरांजली

googlenewsNext
style="text-align: justify;">प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २ - भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज ( २ ऑगस्ट) जन्मदिन. 
पिंगाली वेंकय्या यांचे नाव फारसे कुणाला माहीत नाही. मात्र त्यांनीच भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते. 
कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी २ ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.
पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळीपर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॅनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.
 
१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले. 

Web Title: Respect for birth anniversary of Pingali Venkayya of Tricolor idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.