मनमोहन सिंग यांच्याविषयी आदर, सरकारच्या खुलाशाने कोंडी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:17 AM2017-12-28T05:17:57+5:302017-12-28T05:18:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत निर्माण झालेली कोंडी अखेर सरकारच्या खुलाशानंतर फुटली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत निर्माण झालेली कोंडी अखेर सरकारच्या खुलाशानंतर फुटली. आम्हाला डॉ. सिंग यांच्याविषयी आदर असून, देशाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीवर आम्हाला शंका नाही, असे निवेदन राज्यसभेचे सभागृहनेते अरुण जेटली यांनी केले. त्यानंतर, काँग्रेसनेही समजूतदारपणाची भूमिका घेतली. काही नेत्यांनी पंतप्रधानांविरोधात केलेले वक्तव्य ही काँग्रेसची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.
या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही दिवस स्थगित करावे लागले होते. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी डॉ. मनमोहन सिंग हे पाकच्या वरिष्ठ अधिका-यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते, अशी टीका मोदी यांनी केली होती. याबाबत काँग्रेसने म्हटले की, मोदी यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून डॉ. सिंग व इतर नेते पाकिस्तानसोबत कट रचत असल्याचा समज निर्माण होतो. मोदी यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशीही काँग्रेसची मागणी होती.
>गुलाम नबी आझाद यांनी मानले आभार
जेटलींच्या निवेदनाला उत्तर देताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जेटली यांनी केलेल्या निवेदनाबद्दल आभार मानले. या निवेदनानंतर आता संसदेतील कामकाज सुरळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील कोणत्याही शेरेबाजीला आम्ही मान्यता देत नाही, असे स्पष्ट केले. मोदी यांच्याबद्दल ‘नीच’ शब्द वापरणा-या अय्यर यांना पक्षातून निलंबित केले आहे.
बुधवारी निवेदन करताना जेटली म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या देशाबद्दलच्या बांधिलकीवर कधीही प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला नाही. तसे त्यांना म्हणायचेही नव्हते. मात्र, तशा प्रकारचा समज निर्माण होणे पूर्णपणे चुकीचा आहे. या नेत्यांबद्दल आम्हाला मोठा आदरच आहे. गुजरातेत प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. मात्र, अशा मुद्द्यांवरून संसदेचे काम बंद राहावे, असे सरकारला वाटत नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी कामकाज केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनेत बदल करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आल्यामुळे सकाळी कामकाज तहकूब झाले होते.