मुस्लिम महिलांचाही आदर कर, योगी आदित्यनाथांना वडिलांचा सल्ला
By Admin | Published: March 22, 2017 11:32 AM2017-03-22T11:32:33+5:302017-03-22T12:26:50+5:30
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंग बिश्त यांनी आपल्या मुलाला काही महत्वाचे सल्ले दिले आहेत
>ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 22 - उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंग बिश्त यांनी आपल्या मुलाला काही महत्वाचे सल्ले दिले असून सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. 'बुरखा घातलेल्या महिलांनीही तुला मतदान केलं आहे. प्रत्येक धर्माचा आदर करणं आणी त्याची मनं जिकंणंही तुझ्यासाठी गरजेचं असल्याचं', आनंद सिंग बिश्त बोलले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना आनंद सिंग बिश्त यांनी आपल्या मुलावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं सांगितलं आहे. 'ट्रिपल तलाक आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर भाजपाकडून खुप सा-या अपेक्षा असल्याने मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान केलं आहे. भाजपा आणि आदित्यनाथ आम्हाला विकासाच्या मार्गावर नेतील असा विश्वास लोकांना वाटत आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात राहिली पाहिजे', असंही आनंद सिंग बिश्त बोलले आहेत.
आनंद सिंग बिश्त आपली पत्नी सावित्री यांच्यासोबत पऊरी जिल्ह्यातील पंचूर गावात राहतात. 'पहिल्याच दिवशी आपल्या मुख्यमंत्री मुलाने लोकांच्या भावना दुखावतील अशी भाषा न वापरण्याचा आदेश दिला. तो मनापासून प्रयत्न करत असून ते दिसत आहे', असं म्हणत आनंद सिंग बिश्त यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मुलाने हिंदुत्व प्रचारकाचा शिक्का पुसण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे.
योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी झाला. त्यांचं नाव अजय सिंग बिश्त ठेवण्यात आलं होतं. पऊरी येथेच त्यांनी आपलं शालेय शिक्षण पुर्ण केलं. कोटदवार येथून त्यांनी बीएससीचं शिक्षण घेतलं आणि 1993 मध्ये एमएससीचं शिक्षण घेत असताना त्यांनी गोरखपूर सोडलं. आपल्या मुलाने 1994 मध्ये संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 'त्याच्या या निर्णयाने आम्हाला धक्का बसला, तो निर्णय समजून घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला', असं आनंद सिंग बिश्त यांनी सांगितलं.
योगी आदित्यनाथ यांचे मोठे बंधू महेंद्र यांनी 'आपला भाऊ आरएसएसच्या संपर्कात आल्यानंतर योग्य मार्गावर गेला', असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.