आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून होणाऱ्या टीकेला चोख उत्तर द्या; परराष्ट्रमंत्र्यांचे राजदूत, उच्चायुक्तांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:46 AM2021-05-01T05:46:35+5:302021-05-01T05:50:02+5:30
परराष्ट्रमंत्र्यांचे राजदूत, उच्चायुक्तांना आदेश
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्था संपूर्णपणे ढासळलेली असून रुग्णांचे हाल होत आहेत. हे मोदी सरकारचे मोठे अपयश आहे, अशी टीका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांतून होऊ लागली. त्या टीकेला चोख उत्तर द्या, असे आदेश परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी विविध देशांतील भारताच्या राजदूतांना व उच्चायुक्तांना दिला आहे.
यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यात जयशंकर यांनी सांगितले की, भारतातील कोरोना स्थितीसंदर्भात एकांगी स्वरूपाच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यास मोदी सरकार असमर्थ आहे असे चित्र निर्माण केले जात आहे. त्या बातम्यांना भारतीय राजदूत, उच्चायुक्तांनी चोख उत्तर दिले पाहिजे.
बातम्यांत काय?
बेड उपलब्ध नसल्यामुळे इस्पितळाबाहेर ताटकळत असलेल्या कोरोना रुग्णांची दृश्ये व त्याबद्दलच्या बातम्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी दाखविल्या होत्या. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिविरसारख्या औषधांची टंचाई जाणवत आहे, अशा अनेक गोष्टींवर या बातम्यांमध्ये भर देण्यात आला होता.