मोदींनी पाठवलेल्या पत्राला प्रणवदांच्या कन्येने दिले असे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:01 AM2017-08-04T00:01:49+5:302017-08-04T00:04:39+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला होता. त्यानंतर प्रणवदांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले होते. आता प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही या पत्राला उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली, दि. 3 - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक भावपूर्ण पत्र लिहून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला होता. त्यानंतर प्रणवदांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले होते. आता प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही या पत्राला उत्तर दिले आहे.
शर्मिष्ठा यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले आहेत. त्या ट्विटमध्ये म्हणतात, एक मुलगी म्हणून या पत्रासाठी मी तुमचे आभार मानते. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून मी तुमच्या सरकारच्या लोकविरोधी धोरणांवर नेहमीच टीका करत राहीन. आणि हीच भारतीय लोकशाहीची सुंदरता आहे.
Thanks @narendramodi sir from a daughter🙏But as a worker of INC, I'll criticise ur govt's anti-people policies.That's d beauty of democracy😊 https://t.co/JpFGxuOUkP
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) August 3, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्राच्या स्वरूपात खास भेट दिली होती. याआधी प्रणव मुखर्जी माझ्या वडिलांसारखे आहेत, असं म्हणत मोदींना प्रणव मुखर्जी यांचा सन्मान केला होता. आता मोदींनी प्रणव मुखर्जी यांना एक पत्र लिहिलं आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींनी दिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे, असं प्रणव मुखर्जी यांनी म्हंटलं. सुरूवातीला नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये नवीन असताना प्रणव मुखर्जी यांनी कसं मार्गदर्शन केलं, याचा उल्लेख मोदींनी त्यांच्या पत्रात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं पत्र शेअर करताना प्रणव मुखर्जी म्हणाले,'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनालं भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे.
मोदींनी पत्राल लिहिलं, तुम्ही आता एका नव्या पर्वाची सुरूवात करत आहात. राष्ट्रपती असताना तुम्ही या देशाला खूप प्रेरणा दिली आहे. तीन वर्षापूर्वी नवी दिल्लीत मी नवखा होतो. इथे काम करणं माझ्यासाठी एक आव्हान होतं. पण या काळात तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे मला मार्गदर्शन केलं आणि मदत केली. तुमच्याकडे मोठा राजकीय, आर्थिक, वैश्विक अनुभव आहे ज्याचा फायदा मला आणि माझ्या सरकारला वेळोवेळी झाला आहे. आपण दोघांचा राजकिय प्रवास वेगळा, आपले विचारही वेगळे होते. मी फक्त एका राज्यातून काम करून आलो होतो. तरीही तुमच्या अनुभवाच्या मदतीने आपण एकत्र काम केलं.
तुम्ही माझ्यासाठी नेहमी स्नेही आणि माझी काळजी घेणारे होतात. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही केलेला एक फोन मला नवी ऊर्जा द्यायचा. माझ्या लांबलचक चालणाऱ्या बैठका आणि कॅम्पन्सनी भरलेल्या दिवसांमध्ये तुमचा येणार एक फोन माझ्यात नवा उत्साह निर्माण करायचा. नवा उत्साह मिळविण्यासाठी तुमचा फक्त एक फोन पुरेसा असायचा.
संसदेत निरोप समारंभाच्या वेळी प्रणव मुखर्जींनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचाही या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यासाठी मोदींनी प्रणव मुखर्जी यांचे पत्रातून आभार मानले आहेत.