विमानतळावर अधिकाऱ्याच्या ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद देणं प्रवाशाला पडलं महागात, झाली थेट तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 04:21 PM2024-09-14T16:21:00+5:302024-09-14T16:21:33+5:30
Fake Passport Case: नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अधिकाऱ्याच्या गुड मॉर्निंगला प्रतिसाद देणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं.
नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे अधिकाऱ्याच्या गुड मॉर्निंगला प्रतिसाद देणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडलं. प्रवाशाने दिलेल्या उत्तरामुळे संशय आलेल्या अधिकाऱ्याचा संशय बळावला. त्याने सखोल चौकशी केली आणि त्याला अटक करून विमानतळ प्रशासनाच्या ताब्यात दिले. दरम्यान, या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरा गांधी विमानतळ पोलिसांनी या प्रवाशावर अटकेची कारवाई करून त्याची तुरुंगात रवानगी केली.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी इमिग्रेशनच्या काऊंटरवर पोहोचला. तिथे या प्रवाशाकडील पासपोर्ट घेत इमिग्रेशन अधिकाऱ्याने गुड मॉर्निंग असं बोलत त्याचं स्वागत केलं. इमिग्रेशन अधिकारी पासपोर्टची पडताळणी करत असतानाच या प्रवाशाने गुड मॉर्निंगला प्रत्युत्तर दिलं. मात्र त्याचं बोलणं ऐकून एमिग्रेशन अधिकारी अवाक् झाला.
संशय आल्याने या अधिकाऱ्याने त्या पॅसेंजरच्या पासपोर्टची कसून तपासणी केली. तसेच या प्रवाशालाही दोन चार प्रश्न विचारले. त्यावर या प्रवाशानं दिलेली उत्तरं ऐकून अधिकाऱ्याचा संशय आणखीनच बळावला. काहीतरी गडबड आहे, असा संशय आल्याने त्या प्रवाशाला ताब्यात घेत इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्याच्याकडील सामानाची तपासणी केली. त्यामधून मिळालेल्या एका कागदपत्रामुळे या प्रवाशाची पूर्णपणे पोलखोल झाली. या प्रवाशाकडील ते कागदपत्र म्हणजे बांगलादेशचा पासपोर्ट होता.
त्यामुळे समोर उभी असलेली व्यक्ती ही बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो भारतीय पासपोर्टवर अवैधपणे प्रवास करत असल्याचेही समोर आले. या प्रवाशाची ओळख जमाल हुसेन अशी असल्याचं समोर आलं. तसेच तो ढाका येथील केरानीगंज येथील रहिवासी असल्याचंही समोर आलं. तसेच जमालकडे सापडलेल्या भारतीय पासपोर्टमुळेही एका नव्या प्रकरणाला वाचा फुटली.
विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधिक एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या बांगलादेशी नागरिकाजवळ सापडलेल्या भारतीय पासपोर्टवर त्याचं नाव अब्दुल बातेन असं नोंदलेलं होकं. तर इमिग्रेशनकडे असलेल्या नोंदीमध्ये हा पासपोर्ट पश्चिम बंगालमधील नादिया येथील बशीर शेख याच्या नावावर नोंदवलेला होता. त्यामुळे आरोपी जमाल हुसेन याने बनावट कागदपत्रं तयार करून अब्दुल बातेन नावाने भारतातील पासपोर्ट मिळवल्याचं त्यानंतर जमाल हुसेनच्या पासपोर्टमधील बायोडेटा पेजला आपल्या पासपोर्टच्या बायोडेटा पेजद्वारे बदलले, अशी माहितीही समोर आली आहे.