चर्चा प्रकिया रखडण्यासाठी पाक जबाबदार - स्वराज
By Admin | Published: September 9, 2014 04:19 AM2014-09-09T04:19:45+5:302014-09-09T04:19:45+5:30
भारत-पाक चर्चा प्रक्रिया रखडली असेल तर यासाठी पाकिस्तान स्वत: जबाबदार आहे. पण राजनयिक संबंधांमध्ये 'पूर्णविराम' नसतो.
नवी दिल्ली : भारत-पाक चर्चा प्रक्रिया रखडली असेल तर यासाठी पाकिस्तान स्वत: जबाबदार आहे. पण राजनयिक संबंधांमध्ये 'पूर्णविराम' नसतो. केवळ स्वल्पविराम असतो आणि यानंतर पुढे चालायचे असते, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सोमवारी उभय देशांतील द्विपक्षीय चर्चेच्या शक्यता संपल्या नसल्याचे संकेत दिले.
पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत विचारले असता, स्वराज बोलत होत्या. राजनयिक संबंधांमध्ये कधीही पूर्णविराम नसतो. त्यामुळे लोक नेहमी पुढे जातात, असे त्या म्हणाल्या. पाकी उच्चायुक्तांना काश्मिरी फुटीरवाद्यांना चर्चेसाठी आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चेची काय गरज होती, मला माहीत नाही. स्वत: पाकने फुटीरवाद्यांना निमंत्रण दिले. भारतासोबतच्या चर्चेत त्यांनी रोडा का घातला? त्यांनी यातून काय साध्य केले, हेही ठाऊक नाही. पण भारत-पाक चर्चेचा खोळंबा कुणी केला असेल तर तो पाकिस्तानने, असे स्वराज यावेळी म्हणाल्या या महिनाअखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान नरेद्र मोदी आणि पाकी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट शक्य आहे का? असे विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल, केवळ एवढेच त्या म्हणाल्या.