निश्चिंत राहा! तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 03:05 PM2018-02-21T15:05:17+5:302018-02-21T15:05:41+5:30
M2M मोबाईल क्रमांक 13 अंकी करण्यासाठीच्या पोर्ट प्रक्रियेला 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात होणार आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये मोबाईलचा क्रमांक 13 अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. याविषयी स्पष्ट माहिती मिळत नसल्यामुळे काहीसा गोंधळही निर्माण झाला होता. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक 10 अंकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दूरसंचार मंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये M2M (मशिन टू मशिन) मोबाईल नंबर 10 वरून 13 अंकी होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आपल्या मोबाईलचा नंबरही बदलणार असा समाज पसरला होता. परंतु, सामान्य मोबाईल क्रमांक आणि M2M नंबर्समध्ये फरक असतो. M2M मोबाईल नंबर हे स्वाईप मशिन्स, कार, वीजेची मीटर्स यांसारख्या उपकरणांसाठी वापरले जातात. त्यामुळे हा बदल सामान्य ग्राहकांसाठी नसेल असे भारती एअरटेल आणि जिओच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, M2M मोबाईल क्रमांक 13 अंकी करण्यासाठीच्या पोर्ट प्रक्रियेला 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात होणार आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मशिन टू मशिन नेटवर्क (M2M) असणाऱ्या ग्राहकांना 1 जुलै 2018 पासून 13 अंकी क्रमांकाचा वापर करणे अनिवार्य असेल.