रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह 160 देशांमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 05:29 PM2024-01-08T17:29:49+5:302024-01-08T17:30:25+5:30
जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.
Ram Mandir Pran Pratishtha In Foreign Country : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या सोहळ्याबाबत जल्लोषाचे वातावरण आहे. जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.
अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्ये मंदिरांमधील पूजा पाठ, शोभा यात्रा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम थेट दाखवले जाणार आहेत. जगात असे 160 देश आहेत, जिथे हिंदू धर्माचे लोक राहतात. विश्व हिंदू परिषदेने जगभरातील देशांमध्ये रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्याची योजना तयार केली आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे.
विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी न्यूज 18 शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जगातील 160 देशांमध्ये जिथे हिंदू राहतात तिथे कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील 50 हून अधिक देशांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील. तसेच, प्राणप्रतिष्ठेचा सोहळा त्याठिकाणी लाईव्ह दाखविला जाईल, असेही आलोक कुमार यांनी सांगितले.
याचबरोबर, आलोक कुमार यांनी सांगितले की, अमेरिकेतील 300, ब्रिटनमध्ये 25, ऑस्ट्रेलियातील 30, कॅनडामध्ये 30, मॉरिशसमध्ये 100 व्यतिरिक्त आयर्लंड, फिजी, इंडोनेशिया आणि जर्मनी सारख्या 50 हून अधिक देशांमध्ये रामललाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील. कार्यक्रमांबद्दल सांगायचे तर शहरातील मंदिरांमध्ये शोभा यात्रा, हवन पूजा, हनुमान चालीसा पठण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्याची तयारी सुरू आहे.
जर्मनी सारख्या देशांमध्ये जेथे टाइम झोननुसार वेळ अनुकूल आहे, तेथे ते लाईव्ह पाहिले जाईल. अमेरिकेसारख्या देशात जेथे टाइम झोन सुसंगत नाही, तेथे मंगला आरतीचा कार्यक्रम एकत्रितपणे पाहिला जाईल, असे आलोक कुमार यांनी सांगितले. याशिवाय, प्रभू रामललाच्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फिजी अशा 50 देशांच्या प्रतिनिधींनाही अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, असे आलोक कुमार म्हणाले.