भाजपात बेचैनी!
By Admin | Published: January 13, 2015 05:38 AM2015-01-13T05:38:50+5:302015-01-13T12:15:30+5:30
कसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्येही केवळ मोदींच्या नावे मते मागणा-या भाजपासाठी हा मोठा धक्का आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बहुप्रतीक्षित दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आदल्या रात्री लागलेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणूक निकालात भाजपाला नरेंद्र मोदींच्या वाराणशीसह अनेक ठिकाणी पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्येही केवळ मोदींच्या नावे मते मागणा-या भाजपासाठी हा मोठा धक्का आहे. स्वत: पंतप्रधान मोदी प्रतिनिधित्व करीत असलेल्या वाराणशीत कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सातही जागा गमावल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीलाटेचा भर ओसरू लागल्याच्या जाणिवेने भाजपात बेचैनी आली आहे, तर काँग्रेसच्या आशेत भर पडली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनौमध्येही भाजपाने कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सर्व जागा अपक्षांपुढे गमावल्याने भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या मे महिन्यात लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७३ जागा जिंकल्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपशेल आपटी खावी लागल्याने भाजपाला चिंता वाटू लागली आहे. भाजपासाठी त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे दस्तुरखुद्द दिल्लीतील कॅन्टोनमेंटच्या पूर्वी जिंकलेल्या पाचही जागा पक्षाने राखल्या आहेत. पण दिल्लीतच ज्या विद्यमान अपक्ष सदस्याला पक्षात घेऊन भाजपाने तिकीट दिले, तोही पराभूत झाला आहे.
> विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला मतदान
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी एकाच टप्प्यात येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून, १० फेबु्रवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़ एस़ संपत यांनी आज सोमवारी एका पत्रपरिषदेत दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला़ याचसोबत दिल्लीत तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली़