जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 05:15 AM2020-07-27T05:15:25+5:302020-07-27T05:15:43+5:30
स्थानबद्धतेनंतर प्रथमच दिली मुलाखत : नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘विश्वासघात’ करून जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेतल्याचा अरोप करीत सरकारने हा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकावा, अशी आवाहनवजा आग्रही मागणी काश्मीरचे ज्येष्ठ नेते व ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलल्याला येत्या ५ आॅगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अब्दुल्ला यांनी हे आवाहन केले. काश्मीरच्या या दर्जा बदलानंतर १० महिने स्थानबद्ध केल्या गेलेल्या या ८२ वर्षांच्या नेत्याने सुटकेनंतर माध्यमांना दिलेली ही पहिलीच मुलाखत होती.
अब्दुल्ला म्हणाले की, ज्या विश्वासाने काश्मीर भारतात विलीन झाले त्याचा तो विश्वास केंद्र सरकारच्या या निर्णयाने पार धुळीला मिळाला आहे. केंद्र सरकारला काश्मिरी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकावाच लागेल व तो जिंकण्यासाठी अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा जम्मू-काश्मीरला पुन्हा बहाल करणे हाच एकमेव उपाय आहे.
अब्दुल्ला म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द केले की जम्मू-काश्मीरची भरभराट होईल, तेथील दहशतवाद संपुष्टात येईल, असे स्वप्न केंद्र सरकारने दाखविले; पण लोकांना विचाराल तर ते सांगतील की, दहशतवाद कमी होण्याऐवजी उलट आणखी वाढला आहे. खरे तर नवे काही मिळण्याऐवजी आम्ही होते तेही गमावून बसलो आहोत. नॅशनल कॉन्फरन्सने इतर अनेकांप्रमाणे केंद्र सरकारच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे व न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे ते म्हणाले.
गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर हताश
आधी दोन दशकांच्या दहशतवादाने काश्मीर पोळले आहे. आता कोरोना महामारीने लोक हैराण झाले आहेत. त्यातच आमचा गौरवही हिरावून घेतल्याने काश्मीर पार हताश झाले आहे. आम्ही हातात कधीही बंदूक घेतलेली नाही व यापुढेही घेणार नाही. एक राजकीय पक्ष म्हणून या अन्यायाविरुद्ध आम्ही सर्व सनदशीर मार्गांनी शेवटपर्यंत लढत राहू, असेही ते म्हणाले की,