मुंबई, गुजरातमधून ६० कोटींची प्रतिबंधित औषधे जप्त
By admin | Published: August 17, 2016 04:19 AM2016-08-17T04:19:48+5:302016-08-17T04:19:48+5:30
परदेशातील नशेखोरांसाठी मुंबई, गुजरातमधून औषधांची तस्करी सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या कारवाईतून समोर आली.
मुंबई : परदेशातील नशेखोरांसाठी मुंबई, गुजरातमधून औषधांची तस्करी सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या कारवाईतून समोर आली. केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी शाखेने मुंबई व गुजरातच्या औषध निर्मिती कारखान्यांवर छापे घालून तब्बल ६० कोटी रुपयांचा प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त केला आहे. मुंबईच्या ‘केसी’ तर अहमदाबादच्या ‘डॉल्फिन फार्म’चा यामध्ये समावेश आहे.
या औषधांचा बेहिशोबी साठा करून तो अमेरिका, आॅस्टे्रलिया आणि लंडनमधील अंमली पदार्थ तयार करणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळ्यांना दिला जात असल्याचे समोर आले. या औषधांच्या अतिसेवनाने नशा येते. त्यामुळे याचा जास्तीचा साठा ठेवण्यास एफडीएकडून परवानगी देण्यात येत नाही. असे असतानाही या कंपन्यांनी जास्तीचा साठा ठेवला होता. या साठ्यांची परदेशात तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार एनसीबीने या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. अहमदाबादच्या डॉल्फिन फार्म येथे झोल्पीडेम, अल्प्राझोलम आणि आॅक्सिकोडेन या औषधांच्या सुमारे ९ लाख गोळ्यांचा साठा सापडला. इतका साठा करण्याची कंपनीला परवानगी नव्हती. पुढील चौकशीत डॉल्फिनचा संचालक अनील लुहार, झाहिद शेख यांनी हा साठा अंधेरीच्या कृष्णन चौधरी तथा केसी फार्मा कंपनीकडून घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली.
त्यानुसार, अहमदाबाद व मुंबई युनिटने केसी फार्मावर छापा टाकून ४७ हजार गोळ्या जप्त केल्या. या कारवाईनंतर एनसीबीने चौघांना अटक केली. चौकशीदरम्यान अमेरिका, लंडन आणि आॅस्टे्रलियामध्ये या तिन्ही औषधांना बंदी आहे. मात्र तेथील अंमली पदार्थ तस्करांना भारतातून पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही कारवायांत तब्बल ६० कोटींची औषधे हस्तगत करण्यात आली आहेत. अशी माहिती तपासात उघड झाली. याप्रकरणी एनसीबीकडून अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)