दरवाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्बंध, प्रतिटन ८०० डॉलर किमान निर्यातदर निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 01:31 PM2023-10-29T13:31:07+5:302023-10-29T13:32:09+5:30
दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ऐन दिवाळीआधी भडकलेले कांद्याचे दर काबूत आणण्यासाठी शनिवारी केंद्र सरकारने फ्री ऑन बोर्ड तत्त्वावर कांद्याचा किमान निर्यातदर प्रतिटन ८०० अमेरिकन डॉलर करण्यात येत असल्याची घोषणा केली. कांद्याच्या शिल्लक साठ्यात भर घालण्यासाठी आणखी दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचीही केंद्राने घोषणा केली आहे.
कांद्याचा किमान निर्यातदर प्रतिटन ८०० डॉलर निश्चित केल्यामुळे कोणत्याही निर्यातदाराला ६७ रुपये प्रतिकिलो दरापेक्षा कमी दराने कांदा निर्यात करता येणार नाही. हा निर्णय २९ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे निर्यातीला आळा बसून देशात पुरेशा प्रमाणात कांदा उपलब्ध होईल. ग्राहकांना किफायतशीर दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पाच लाख टन कांद्याची खरेदी केली आहे.
दिल्लीत कांदा भडकला
- दिवाळीचा सण आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कांद्याचे दर कडाडले आहेत.
- दिल्लीत अपुऱ्या पुरवठ्यामुळे कांद्याने प्रतिकिलो ७० ते ८० रुपये भाव गाठला. लवकरच तो शंभरी गाठेल, अशी शक्यता आहे.
- १९९८ साली याच मोसमात झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान कांद्याचे भाव गगनाला पोहोचल्यामुळे भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता.