भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासंबंधीचे निर्बंध ३१ जुलैनंतर लागू
By Admin | Published: April 19, 2016 06:35 PM2016-04-19T18:35:08+5:302016-04-19T18:50:52+5:30
भविष्य निर्वाह निधीतली 1 मेपासून लागू होणार निर्बंध आता 31 जुलैनंतर लागू होणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, १९- केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या पीएफ संबंधीच्या नव्या प्रस्तावाला अनेक स्तरातून विरोध झाला आहे. त्यामुळे या प्रस्तावाला 3 महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली. भविष्य निर्वाह निधीतली 1 मेपासून लागू होणार निर्बंध यामुळे 31 जुलैनंतर लागू होणार आहेत. आम्ही याबाबत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी दिलं आहे. कामगार मंत्रालयाने सोमवारी भविष्य निर्वाह निधी खात्यातील (पीएफ) रक्कम काढण्यावरील निर्बंध शिथील केले होते. त्यामुळे आता घर खरेदी, व्यक्तीच्या गंभीर आजारावरील उपचार, पाल्याचे अभियांत्रिकी शिक्षण या कारणांसाठी नोकरदार वर्गाला पीएफची संपूर्ण रक्कम खात्यातून काढता येणार आहे. येत्या १ मेपासून याबाबतचा नवा नियम लागू होणार होता. मात्र तो आता 31 जुलैमध्ये लागू होणार आहे. पीएफची संपूर्ण रक्कम काढण्यासाठी वयाची ५८ वर्षं पूर्ण होईपर्यंत थांबावे लागणा-या लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यापैकी संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा निर्णय कायम राखण्यात आला आहे. आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढण्याचा अधिकार होता. पण आता अशा कर्मचा-यांना ‘पीएफ’मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम काढता येईल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नसल्याचं यावेळी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच कामगार मंत्रालयानं महिला नोकरदारांना विशेष सवलत दिली आहे. महिलेने लग्न, गरोदरपण आणि बाळाच्या जन्मासाठी नोकरी सोडल्यास दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही संपूर्ण रक्कम मिळू शकणार आहे.