कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलैला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:24 AM2019-07-05T03:24:37+5:302019-07-05T03:24:50+5:30
तरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत.
नवी दिल्ली : कथित हेरगिरी व दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्याचा निकाल १७ जुलै रोजी लागणार आहे.
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा आदेश पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा म्हणून तिथे भारताने दाद मागितली होती. जाधव यांचा भारतीय राजदूतावासाशी संपर्क होऊ न देणे, खोट्या पुराव्यांवर खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावणे अशी कृत्ये करून पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून मार्च २०१६मध्ये अटक केल्याचा पाकिस्तानने केलेला दावा भारताला मान्य नाही. कुलभूषण जाधव यांचे इराणमध्ये व्यवसायानिमित्त गेले असता तेथे त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे भारताने म्हटले आहे.