Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:29 AM2021-10-29T05:29:19+5:302021-10-29T05:29:48+5:30
Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
नवी दिल्ली : ‘नीट २०२१’ चा निकाल या आठवडाअखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली
होती.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
या आदेशानुसार आता एनटीए मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. न्या. एल. नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशात महाराष्ट्रातील त्या दोन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्यास सांगण्यात आले होते, त्यांच्या टेस्ट बुकलेट आणि ओएमआर शीटस मिसळले गेले होते.
‘त्या’ विद्यार्थ्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय
एनटीएकडून सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, दिवाळीच्या सुटीनंतर या दोन विद्यार्थ्यांच्या याचिकेवर निर्णय घेण्यात येईल. तथापि, या घडामोडींसाठी १६ लाख विद्यार्थ्यांच्या निकालावर स्थगिती देता येणार नाही.
उच्च न्यायालयाला हे आढळून आले होते की, वैष्णवी भोपाली आणि अभिषेक या दोन विद्यार्थ्यांचे टेस्ट बुकलेट आणि ओएमआर शीटस टेस्ट सुरु होण्यापूर्वी मिसळले गेले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता.