‘नीट’चा निकाल २६ जूनपर्यंत
By admin | Published: June 13, 2017 01:45 AM2017-06-13T01:45:40+5:302017-06-13T01:45:40+5:30
देशभरातील सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरातील सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) चा निकाल येत्या २६ जूनपर्यंत जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यादृष्टीन सोमवारीे लगेच तयारी सुरु केली.
याचाच एक भाग म्हणून ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्क रेकग्निशन रिस्पॉन्स) शीट््स आणि ‘आन्सर कीज’ प्रसिद्ध करण्याच्या व त्यांना आव्हान देण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या.
मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ‘ओएमआर शीट््स’ आणि उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना दिलेली उत्तरे यांच्या प्रतिमा मंगळवार दि. १३ जून रोजी प्रर्शित केल्या जातील. त्यांना उमेदवार १४ जूनच्या सा. ५ पर्यंत आव्हानदेऊ शकतील. आधी या आव्हानासाठी ठरविलेली तीन दिवसांची मुदत कमी करून दोन दिवस करण्यात आली आहे. याचप्रमाणे ‘आन्सर कीज’ १५ जून रोजी प्रदर्शित केल्या जातील व त्यांना १६ जूनच्या सा. ५ वाजेपर्यंत आव्हान देता येईल.
‘नीट’च्या वेबसाइटवर उमेदवारांना ‘ओएमआर शीट््स’ व ‘आन्सर कीज’ पाहता येतील. तसेच याच वेबसाइटवर आपल्या परीक्षा क्रमांक आणि पासवर्डने लॉग-इन करून उमेदवार या दोन्हींना आॅनलाइन आव्हान दाखल करू शकतील. प्रत्येक प्रश्नाच्या आव्हानासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागेल. ठरलेल्या वेळेत आणि फक्त आॅनलाइन दाखल केलेले आव्हानच विचारात घेतले जाईल.
इंग्रजी व हिंदी याखेरीज अन्य भाषांमधील प्रश्नपत्रिकांमधील प्रन निरनिराळे होते या मुद्यावर मद्रास उच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास अंतरिम स्थगिती दिल्याने आठ जून रोजी अपेक्षित असलेले निकाल जाहीर होऊ शकले नव्हते. मात्र ‘सीबीएसई’ने याविरुद्ध केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविली व २६ जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला.
एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे १७ लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत.