मंत्री करतात साडेसहा तास कारप्रवास, ज्योतिषाच्या सल्ल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:52 AM2018-07-06T05:52:53+5:302018-07-06T05:53:14+5:30
कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत.
बंगळुरू : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत. रोज येण्याजाण्यात त्यांना ३६0 किलोमीटरहून अधिक अंतर कापावे लागत आहे. ते बंगळुरूमध्ये स्वत:चे घर विकत घेऊ शकतात. पण स्वत:च्या मालकीच्या घरात तुम्ही राहू नका, असा सल्ला त्यांना ज्योतिषाने दिला आहे.
एच.डी. रेवण्णा हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत. तुम्ही सरकारी बंगल्यात राहण्यात अडचण नाही, पण स्वत:च्या घरात राहता कामा नये, असा ज्योतिषाचा अजब सल्ला पाळण्यासाठी ते रोज साडेसहा तास प्रवासात घालवत आहेत. स्वत:च्या घरात तुम्ही झोपलात तर काही वाईट घडू शकते, असे ज्योतिषाचे म्हणणे आहे. तसे होण्यापेक्षा साडेसहा तासांचा प्रवास त्यांना मान्य आहे, असे दिसते.
हा प्रवास टाळायचा तर त्यांना सरकारी बंगला मिळायला हवा. तो लगेच मिळू शकतो. पण त्यांना जो बंगला हवा आहे, तो सध्या आहे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री महादेवप्पा यांच्याकडेच आहे. तो रिकामा करण्यास त्यांनी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे आणखी तीन महिने रेवण्णा यांना रोज साडेसहा तास प्रवास करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे. ते रोज होळेनरसीपूर गावातील घरीच झोपायला जात आहेत. रोज इतका प्रवास करण्यासाठी रेवण्णा सकाळी ५ वाजता उठतात. आधी पूजा करतात, मग चहा-नाश्ता झाल्यानंतर ८ वाजेपर्यंत मतदारसंघातील लोकांना भेटतात, त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. मग ८ वाजता बंगळुरूला जायला निघतात. बंगळुरूत कार्यालयातील कामे आटोपून ते रात्री ९ वाजता पुन्हा गावाकडे निघतात. घरी पोहोचपर्यंत मध्यरात्र झालेली असते. तरीही आपले भले व्हावे, काही वाईट होऊ नये, यासाठी ते ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच वागत आहेत. याला अंधश्रद्धा म्हणायचे की आणखी काही? (वृत्तसंस्था)
महादेवप्पांना तो बंगला लकी
ज्यांच्याकडे असलेला बंगला रेवण्णा यांना हवा आहे, ते महादेवप्पा २०१३ पासून तेथे राहत आहेत. हा बंगला आपल्यासाठी भाग्यशाली ठरला होता. या बंगल्यामुळे आपण मंत्री म्हणून स्वत:ची छाप उठवू शकलो, असे महादेवप्पा सांगतात.