आठ मिनिटांत निकाल; दहा वर्षे बंदी
By admin | Published: February 15, 2017 12:22 AM2017-02-15T00:22:48+5:302017-02-15T00:22:48+5:30
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम राखत दोषी ठरवले.
नवी दिल्ली/चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम राखत दोषी ठरवले.
त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची व दहा कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यापैकी सहा महिन्यांची शिक्षा त्यांनी आधीच भोगल्यामुळे त्यांना साडेतीन वर्षे तुरुंगात घालवावी लागतील. या निर्णयामुळे शशीकला यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. शशिकला यांना दहा वर्षे निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
बेहिशेबी मालमत्तेचा हा खटला १९ वर्षांपूर्वीचा आहे. त्यात जयललिताही आरोपी होत्या. या खटल्यात बंगळुरू येथील न्यायालयाने दिलेला निवाडा आणि काढलेले निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले.
शशिकला यांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि एलारावसी हेही यात दोषी ठरले आहेत. न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने बंगळुरू येथील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
त्या तुरुंगातून सुटल्यानंतरही लोकप्रतिनिधी कायद्यान्वये सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि परिणामी मुख्यमंत्रीही बनू शकणार नाहीत.
खालच्या न्यायालयाने शशीकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना प्रत्येकी चार वर्षांचा तुरुंगवास आणि दहा-दहा कोटी रुपये दंड ठोठावला होता. जयललिता यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
आठ मिनिटांत निर्णय
खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय केवळ आठ मिनिटांत घोषित केला. न्या. घोष व न्या. रॉय १०.३२ मिनिटांनी आले. न्यायालयात यावेळी वकील आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती.
दोघा न्यायाधीशांनी चर्चा केल्यानंतर न्या. घोष यांनी निर्णयाचा महत्त्वाचा भाग वाचून पूर्ण केला, तेव्हा १०.४० मिनिटे झाली होती. न्या. रॉय म्हणाले की, समाजातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या संकटाबद्दल आम्हाला तीव्र चिंता वाटत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)