महागाईचा भडका! 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला?; पाहा किती येतो खिशावर ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:26 PM2022-05-24T12:26:48+5:302022-05-24T12:33:39+5:30
Inflation in India : 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत.
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. रोजच्या वापरातील काही गोष्टींसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. भाज्या, फळं, धान्य, कपडे, साबण, शॅम्पू, पावडर यासह अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. कोरोनानंतर आता महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. एप्रिलमध्ये महागाईचा किरकोळ दर 7.79% होता. यापूर्वी 2014 मध्ये महागाईचा दर 8 टक्क्यांपेक्षा वर गेला होता. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं उत्पन्न सरासरी साडेबारा हजार आहे.
सध्याच्या महागाईच्या काळात या 80 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी सरकारतर्फे मोफत धान्य दिलं जातं. महागाईचा दर वाढणं याचाच अर्थ कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत काळानुसार वाढणं. याला कोणत्याही महिना किंवा वर्षाच्या हिशेबानुसार मोजलं जातं. उदाहरणार्थ वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे.
- सध्या महागाईचा दर 2012 च्या बेस प्राईसवर मोजला जातो. म्हणजेच 2012 मध्ये 100 रुपयांत जी गोष्ट आपण खरेदी करू शकत होतो तिच्यासाठी आता किती किंमत मोजावी लागते यावरून त्याचा अंदाज बांधला जातो.
- 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170.1 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याच गोष्टीसाठी एक वर्षभरापूर्वी 157.8 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच एका वर्षात तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 12.3 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.
- एका वर्षभरातच तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 157.8 रुपयांऐवजी आता 170.1 रुपये खर्च करावे लागत आहे. याचाच अर्थ महागाईचा दर 7.79% इतका झाला आहे.
भारतात महागाईचा दर मोजण्याचे दोन निर्देशांक आहेत. एक म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि दुसरा आहे घाऊक (होलसेल) मूल्य निर्देशांक (WPI). CPI च्या माध्यमातून महागाईचा किरकोळ दर काढला जातो. तर WPI च्या माध्यमातून किरकोळ महागाई दर मोजला जातो. सर्वसामान्य ग्राहक किरकोळ बाजारातून सामान खरेदी करतात. किरकोळ बाजारातील सामान किती महाग किंवा स्वस्त झालं आहे हे CPI च्या माध्यमातून लक्षात येतं. तर मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या ठोक म्हणजेच घाऊक बाजारातून सामान खरेदी करतात. या होलसेल बाजारातील बदल WPI च्या माध्यमातून समजतात.
2012 मध्ये 100 रुपयांना मिळत होती त्या विविध गोष्टींच्या किंमती आता साधारणपणे किती झाल्या आहेत ते जाणून घेऊया...
2012 मध्ये 100 रुपयांना मिळणाऱ्या धान्यासाठी आता 152.9 रुपये मोजावे लागत आहेत. मांस आणि मच्छीची किंमत 211.8 रुपये, अंड्यासाठी 164.6 रुपये, तर दुधासाठी 163.9 द्यावे लागत आहेत.
तेलासाठी आता 199.5 रुपये, डाळींसाठी 166.2 रुपये, साखर 119.0 रुपये मोजावे लागत आहेत. फळांची किंमत आता 172.6 रुपये, भाजीची किंमत 166.3 रुपये, मसाल्यांसाठी 181.2 रुपये अशी वाढ झाली आहे.
नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेससाठी 166.2 रुपये, पॅकबंद अन्नपदार्थ, स्नॅक्स, मिठाईची किंमत 180. 9 रुपये झाली आहे.
जेवण आणि पेय 170.8 रुपये, पान-तंबाखू 193.9 रुपये, कपडे 173.9 रुपये, बूट –चप्पल 166.2 रुपये, इंधन आणि लाईट 172.4 रुपये अशी वाढ झाली आहे. 'आजतक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.