'निवृत्त होतोय, कुठलं तरी अध्यक्षपद द्या,' मुख्यमंत्र्यांच्या नावे अतिरिक्त पोलीस महासंचालकांचं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:38 PM2018-08-27T20:38:04+5:302018-08-27T20:48:26+5:30
लखनऊ- उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावे लिहिलेल्या पत्रानं एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या गृहविभागाचे डीजी सूर्यकुमार शुक्ला यांनी योगी आदित्यनाथांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रातून सूर्यकुमार यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमधल्या रिकाम्या असलेल्या आयोगांमध्ये मला सेवा बजावण्याची संधी द्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.
सूर्यकुमार शुक्ला हे 31 ऑगस्टला पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रातून योगी आदित्यनाथ यांच्याकडे केलेल्या मागणीनं चर्चांना उधाण आलं आहे. सूर्यकुमार शुक्ला पत्रात लिहितात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फारच प्रामाणिक, कार्यतत्पर आहेत. त्यांच्या ऐतिहासिक कार्यातही मला सहभागी व्हायचं आहे. मी माझ्या कारकिर्दीत पूर्ण निष्ठेनं आणि प्रामाणिकपणानं जनतेची सेवा केली आहे. निवृत्तीनंतरही मला जनतेची आणि देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. मला संघटनेची कार्ये आणि त्यांच्या विचारधारा पूर्णतः अवगत आहेत.
उत्तर प्रदेशमधल्या अनेक जिल्ह्यांमधल्या पोलीस विभागात मी विविध पदं भूषवत जनतेची सेवा केली आहे. माझ्या या अनुभवाचा मी तुमच्यासाठी उपयोग करेन, मला विश्वास आहे की, तुम्ही उत्तर प्रदेशला विकसित राज्य बनवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात माझा नक्कीच उपयोग होईल. तुमच्या सरकारमधील अनेक पदे अद्याप रिकामी आहेत. त्यातील कोणत्याही पदावर माझी नियुक्ती केल्यास मी तुम्हाला सहकार्य करेन. सूर्यकुमार यांनी उपाध्यक्ष योजना आयोग, अध्यक्ष खादी ग्रामोद्योग बोर्ड, अध्यक्ष राज्य समाज कल्याण बोर्ड आणि अध्यक्ष यूपी प्रदूषण नियंत्रण बोर्डांमधल्या कोणत्याही एका विभागात नियुक्ती देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.