...तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढणार, सरकार तपासणार तिजोरीवरचा भार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:28 PM2018-12-05T16:28:57+5:302018-12-05T16:32:13+5:30
सरकारकडून पेन्शन वाढीचा गांभीर्यानं विचार सुरू
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी संबंधित सदस्यांचं किमान मासिक निवृत्ती वेतन वाढण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं किमान मासिक निवृत्ती वेतन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल बैठक घेतली. या बैठकीला कर्मचारी भविष्य निधी संघटनेचं संचालक मंडळ उपस्थित होतं.
कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन वाढवल्यास सरकारी तिजोरीवर नेमका किती भार पडेल, याची तपासणी केली जात असल्याची माहिती बैठकीनंतर संतोष गंगवार यांनी दिली. 'निवृत्ती वेतनात 1 हजार रुपयांनी वाढ केल्यास तिजोरीवर किती भार पडेल, दोन हजार रुपयांची वाढ केल्यास किती बोजा पडेल, याबद्दलचा विचार बैठकीत करण्यात आला. याबद्दलचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाकडून घेतला जाईल,' अशी माहिती त्यांनी दिली.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टींच्या बैठकीत ईपीएस 1995 (कर्मचारी पेन्शन स्कीम 1995) यावरुन सुरू असलेल्या वादाबद्दल चर्चा झाली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचारधीन आहे. ईपीएस 1995 च्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ईपीएफओच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हाला ईपीएस 1995 च्या अंतर्गत 2014 च्या आधी मिळणाऱ्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.