५ कोटी...! निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची कमाई अयोध्येतील राम मंदिरासाठी दान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:14 PM2023-11-25T15:14:50+5:302023-11-25T15:15:45+5:30
निवृत्त IAS अधिकाऱ्यानं केलेल्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
नवी दिल्ली : निवृत्त IAS अधिकाऱ्यानं केलेल्या एका कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. खरं तर सरकारमध्ये गृहसचिव असलेले निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन यांनी आपल्या आयुष्याची कमाई राम मंदिरासाठी दान केली आहे. नारायणन यांनी रामचरितमानसाठी ५ कोटी रूपये दिले आहेत. ५ कोटी रुपये खर्चून तयार केलेले १५१ किलो रामचरितमानस मूर्तीसमोर बसवले जाणार आहे.
या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असून २४ कॅरेट सोन्यात बुडवले जाणार आहे. त्यानंतर सोन्याने जडवलेली अक्षरे त्यावर लिहिली जातील. यासाठी तब्बल १४० किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोने लागणार आहे. सजावटीसाठी इतर धातू देखील वापरले जाणार आहेत. या पुस्तकासाठी नारायणन यांनी आपली सर्व मालमत्ता विकून सर्व खात्यांमधील पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच पत्नीसह अयोध्येला गेलेल्या नारायणन यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून यासाठी परवानगी घेतली होती.
आईच्या इच्छेमुळे पडले लक्ष्मीनारायण नाव
निवृत्त IAS अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले की, त्यांच्या आईच्या इच्छेमुळे त्यांचे हे नाव पडले. त्यांची आई गरोदर असताना दिल्लीच्या बिर्ला मंदिरात म्हणजेच लक्ष्मी नारायण मंदिरात प्रार्थना केली होती की, जर त्यांना मुलगा झाला तर त्याचे नाव लक्ष्मी नारायण असेल. मग त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि लक्ष्मीनारायणन असे नामकरण करण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची देवावर अपार श्रद्धा आहे.
कोण आहेत एस. लक्ष्मीनारायणन?
एस. लक्ष्मीनारायण हे १९७०च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म दिल्लीत झाला असून ते सध्या देखील दिल्लीतच वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील सुब्रमण्यम केंद्र सरकारमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते.
"देवाने मला जे दिले तेच परत करत आहे"
एस. लक्ष्मी नारायणन सांगतात की, देवाने त्यांना आयुष्यात खूप काही दिले... अनेक प्रमुख पदे भूषवण्याची संधी मिळाली. देवाच्याच कृपेने माझे आयुष्य चांगले गेले. मी डाळ आणि भाकरी खाणारा व्यक्ती आहे. निवृत्तीनंतरही भरपूर पैसे मिळतात, पेन्शनच खर्च होत नाही. देवाने जे काही दिले आहे तेच मी परत करत आहे.