निवृत्त लष्करी डॉक्टर महिलेने केली पतीची हत्या; आरोपी महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:22 AM2020-09-08T00:22:11+5:302020-09-08T00:22:23+5:30
दारूच्या नशेत दोन मुलांसमोरच धारदार चाकूने भोसकले
हैदराबाद : लष्करातील एका निवृत्त महिला डॉक्टरने आपल्या पतीची भोसकून हत्या केल्याची घटना तेलंगणामध्ये घडली. विशेष म्हणजे तिचा पतीही निवृत्त लष्करी अधिकारी आहे. आपल्या दोन मुलांसमोरच तिने पतीला भोसकले. या महिलेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीत झालेल्या वादातून हा प्रकार घडला. बुंदलागुडा जागीर महानगरपालिका हद्दीतील मेपल शहरातील राजेंद्रनगरमध्ये हे निवृत्त लष्करी अधिकारी असलेले जोडपे राहत होते. निवृत्त कॅप्टन विशाल दिवाण आणि त्यांची पत्नी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सबिना रोशन यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या सबिना यांनी धारदार चाकूने विशाल यांना भोसकले. त्यांच्या मुलांनीच पोलिसांना बोलावले. मुलांनी विशाल यांना शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले. तथापि, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
शमशाबादचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, दोघा पती-पत्नीने रात्री सोबतच मद्यपान केले होते. मद्याच्या नशेत असतानाच दोघांचे भांडण जुंपले. पत्नीने रागाच्या भरात पतीवर धारदार चाकूने हल्ला केला.
पती-पत्नीत नेहमीच होत असत भांडणे
त्यांच्या दोन्ही मुलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असत. विशाल यांनी सबिना यांना गेल्याच महिन्यात मारहाण केली होती. विशाल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात पाठविण्यात आला असून, सबिना यांना भादंवि ३0२ अन्वये अटक करण्यात आली आहे.