निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: December 19, 2014 10:56 PM2014-12-19T22:56:53+5:302014-12-19T22:56:53+5:30
आ. जाधवांवर कारवाई करा : बापूंच्या पुतळ्याजवळ निदर्शने
Next
आ. जाधवांवर कारवाई करा : बापूंच्या पुतळ्याजवळ निदर्शने नागपूर : पोलीस निरीक्षकास मारहाण करणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली. आ. जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना बुधवारी सायंकाळी कानशिलात लगावली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तथापि, अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे आ. जाधव यांना पोलीस अटक करू शकले नाहीत. दरम्यान, घटनेमुळे आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांत तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन, नागपूरच्या वतीने निषेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात असोसिएशनचे पदाधिकारी एकत्र झाले. त्यांनी म. गांधी यांच्या पुतळयाजवळ काळ्या फिती लावून आ. जाधव यांचा निषेध केला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. आ. जाधव यांचा अटकपूर्व जामीन रद्द व्हावा, त्यांच्यावरील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे एकत्र करून कोर्टात या प्रकरणांचा तातडीने निकाल लावण्यासाठी प्रयत्न करावे तसेच यानंतर अशा घटना घडू नये म्हणून खास उपाययोजना कराव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. दुपारी १.३० पर्यंत हे निषेध आंदोलन सुरू होते. असोसिएशनचे अध्यक्ष एम. ए. अजिज, सचिव निवृत्त उपअधीक्षक रमेश मेहता, एस. एच. महाजन, सुरेश महाले, नागेश घोडकी, चंद्रकांत हटवार, दिलीप तिडके यांच्यासह अनेक निवृत्त पोलीस अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनीदेखील आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदवला. ----