32 वर्षांपूर्वी घेतली 100 रुपयांची लाच, आता वयाच्या 89 व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:44 AM2023-02-03T08:44:32+5:302023-02-03T08:44:56+5:30
न्यायालयाने वृद्धाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 32 वर्षे जुन्या एका प्रकरणात निवृत्त रेल्वे लिपिकाला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राम नारायण वर्मा असे या दोषी निवृत्त रेल्वे लिपिकाचे नाव असून त्याच्यावर 32 वर्षांपूर्वी 100 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. सध्या दोषीचे वय 89 वर्षे आहे. यासोबतच वृद्धाकडून दंडही वसूल करण्यात आला. न्यायालयाने वृद्धाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दोषी राम नारायण वर्माच्यावतीने वय लक्षात घेऊन शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु सीबीआय न्यायाधीश अजय विक्रम सिंह यांनी तो फेटाळला. शिक्षा कमी केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे म्हटले आहे. एवढेच नाही तर न्यायालयाला विनंती करताना हे प्रकरण 32 वर्षे जुने आहे आणि जामिनावर सुटण्यापूर्वी दोन दिवस तुरुंगात काढले होते. त्यामुळे उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात जावे लागू नये, असेही राम नारायण वर्माने न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले होते.
या अर्जावर सक्त निर्णय घेत न्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणात 2 दिवसांचा तुरुंगवास पुरेसा नाही. या खटल्यातील न्यायासाठी त्याला एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल, कारण लाच घेणे हा गुन्हा आहे. दरम्यान, 1991 मध्ये उत्तर रेल्वेचे सेवानिवृत्त लोको ड्रायव्हर राम कुमार तिवारी यांनी या प्रकरणी सीबीआयकडे एफआयआर दाखल केला होता. तिवारी यांनी एफआयआरमध्ये आरोप केला होता की, त्यांच्या पेन्शनची गणना करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी आवश्यक होती.
या कामासाठी राम नारायण वर्माने 150 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 100 रुपये मागितले होते. सीबीआयने लाचेच्या रकमेसह राम नारायण वर्माला रंगेहात अटक केली होती. सीबीआयने तपास पूर्ण केल्यानंतर राम नारायण वर्मा याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने राम नारायण वर्मा याच्यावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी आरोप निश्चित केले होते.