चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:21 PM2024-10-30T17:21:23+5:302024-10-30T17:23:19+5:30
लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील.
लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे. आता दोन्ही देशांचे सैन्य त्यांच्या चौक्यांवर तैनात राहतील. आता सीमेवर फक्त नियमित गस्त राहणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. हे पाऊल दोन्ही देशांमधील शांततेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.
मिळालेली माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही लष्कर दिवाळीनिमित्त एकमेकांना मिठाई देणार आहेत. पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, दोन्ही लष्करांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरूच राहणार आहे. सध्या तणाव संपला असून दोन्ही देशांच्या चौक्या पूर्वीप्रमाणेच आपापल्या पारंपरिक ठिकाणी राहतील. तब्बल ४ वर्षांनंतर चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थिती सामान्य झाली आहे. भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध थोडे सामान्य होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये झालेल्या संघर्षानंतर भारताने कठोर कारवाई करत अनेक चिनी कंपन्यांवर बंदी घातली होती. याशिवाय अनेक क्षेत्रांतील गुंतवणुकीवरही नियंत्रण आले.
एप्रिल २०२० मध्ये चिनी सैन्याने पूर्व लडाखच्या परिसरात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर भारतीय लष्कराने तीव्र आक्षेप व्यक्त केल्यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाला होता.यावेळी चकमक झाली होती, यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. यामध्ये मोठ्या संख्येने चिनी सैनिकही जखमी झाले होते. मात्र आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. चिनी लष्करानेही शुक्रवारी एका निवेदनात म्हटले होते की, आता दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर त्यांच्या त्यांच्या चौकीवर आहेत. भारत सरकारने २१ ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. सुमारे साडेचार वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता संपुष्टात आला आहे.