आईने बक्षीस दिलेली जमीन परत द्या, कर्नाटक उच्च न्यायालयाचे डाॅक्टर मुलाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:03 AM2024-08-24T06:03:31+5:302024-08-24T06:03:40+5:30
रायचूर येथील शोभा कुलकर्णी यांनी त्यांचा मुलगा डॉ. अनिल यास बंगळुरू येथील आपली जमीन बक्षीसपत्र करुन दिली. या जमिनीवर मुलाने नर्सिंग होम बांधले. म्हातारपणात मुलगा आपली काळजी घेईल, अशी त्यांना आशा होती.
- डॉ. खुशालचंद बाहेती
बंगळुरू : मुलाला जमीन देताना बक्षीसपत्रात वृद्ध आईची काळजी घेण्याची अट नसली तरीही ते मुलावर बंधनकारक आहे, असे कर्नाटक हायकोर्टाने म्हटले आहे. रायचूर येथील शोभा कुलकर्णी यांनी त्यांचा मुलगा डॉ. अनिल यास बंगळुरू येथील आपली जमीन बक्षीसपत्र करुन दिली. या जमिनीवर मुलाने नर्सिंग होम बांधले. म्हातारपणात मुलगा आपली काळजी घेईल, अशी त्यांना आशा होती.
तथापि, मुलाने तिची आणि वडिलांची काळजी घेण्यात पूर्णपणे अनास्था दर्शविली. वृद्धापकाळात त्यांना मूलभूत सुविधाही मुलगा पुरवत नव्हता. मुलाने काळजी घ्यावी म्हणून दिलेला तिचा अर्ज ज्येष्ठ नागरिक कल्याण समितीने फेटाळला. याला आईने हायकोर्टात आव्हान दिले.
मुलाचा युक्तिवाद होता की, त्याचे वडील सेवानिवृत्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. स्वतःची आणि पत्नीची काळजी घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी संसाधने आणि पेन्शन आहे. याचिका प्रलंबित असताना वडील वारले असले तरी आईला कुटुंब निवृत्ती वेतन मिळते. पालकांची काळजी घेण्याची अट बक्षीसपत्रात नाही. त्यामुळे आता ती लादता येणार नाही. हायकोर्टाने मुलाचे म्हणणे फेटाळले.
आई किंवा वडिलांनी एखादी मालमत्ता भेट दिल्यास त्यांची संतती म्हातारपणात त्यांच्या गरजा पूर्ण करतील, अशी वाजवी अपेक्षा असते, असे समजले जाऊ शकते. केवळ बक्षीसपत्रात म्हातारपणी आईची काळजी घेण्याची अट नाही म्हणून काळजी घेण्याचे बंधन नाही, हे म्हणणे अस्वीकार्य आहे.
- न्यायमूर्ती सुरज गोविंदराज,
कर्नाटक उच्च न्यायालय, कलबुर्गी