आणखी सात साहित्यिक पुरस्कार परत करणार

By Admin | Published: October 12, 2015 10:53 PM2015-10-12T22:53:58+5:302015-10-12T22:53:58+5:30

देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी

To return seven more literary awards | आणखी सात साहित्यिक पुरस्कार परत करणार

आणखी सात साहित्यिक पुरस्कार परत करणार

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात धर्मांधतेच्या विषाचा केला जाणारा प्रसार आणि वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवारी आणखी सात अग्रणी लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. दरम्यान, बुकर पुरस्कारप्राप्त लेखक सलमान रश्दी यांनीही पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना समर्थन दिले आहे.
रश्दी यांनी म्हटले आहे की, मी नयनतारा सहगल व अन्य लेखकांच्या विरोधाशी सहमत आहे. जवाहरलाल नेहरूंच्या ८८ वर्षीय भाची असलेल्या सहगल यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेल्या पहिल्या तीन साहित्यिकांत समावेश आहे.
सोमवारी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेणाऱ्या अग्रणी साहित्यिकांत काश्मिरी लेखक गुमाल नबी ख्याल, उर्दू कादंबरीकार रहमान अब्बास, कन्नड लेखक आणि अनुवादक श्रीनाथ डी.एन., हिंदी लेखक राजेश जोशी व मंगलेश डबराल, वरयाम संधू, जी. एन. रंगनाथ राव यांचा समावेश आहे. ख्याल यांनी म्हटले आहे की, देशातील अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षितपणाची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असल्यावरून साहित्य अकादमीने २३ आॅक्टोबरला बैठक बोलावली आहे. अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी म्हटले आहे की, ही संस्था भारताच्या घटनेमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी बांधील आहे. उर्दू लेखक रहमान अब्बास यांनी म्हटले आहे की, दादरीच्या घटनेनंतर उर्दू लेखक समुदाय अत्यंत निराश झाला आहे. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना त्यांची तिसरी कादंबरी ‘खुदा के साये में आंख मिचौली’साठी २०११ मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. श्रीनाथ यांनी म्हटले आहे की, पेनच्या जागी आता गोळ्या चालवल्या जात आहेत. भीष्म साहनी यांच्या हिंदीतील लघुकथांचा कन्नडमध्ये अनुवाद केल्याबद्दल श्रीनाथ यांना २००९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.कलबुर्गी यांच्या हत्येबाबत अकादमीने पाळलेल्या मौनाचा विरोध करताना डबराल आणि जोशी यांनी म्हटले आहे की, मागील एक वर्षात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांवर हिंदुत्ववादी शक्ती हल्ला करीत आहेत. ते कधीही स्वीकारार्ह नाही. दरम्यान, अकादमीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याबाबत अकादमीला माहिती दिलेली नाही, असे सांगितले. उदय प्रकाश, जी. एन. देवी, अमन सेठी, वारयाम सिंधू आणि जी. एन. रंगनाथ राव यांच्याशिवाय कोणत्याही लेखकाने माहिती दिलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
लेखक, कवी आणि नाटककार असलेल्या राजेश जोशी यांना २००२ मध्ये ‘दो पंक्तियों के बीच’ या कलाकृतीसाठी अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी सांगितले की, अकादमीच्या अध्यक्षांना मी पत्र लिहिले असून, पुरस्काराची रक्कम लवकरच परत करणार आहे, अशी माहिती दिली आहे. देशात ज्या प्रकारे धर्मांधतेचे वातावरण पसरवले जात आहे, ते सहिष्णुतेच्या परंपरेला साजेसे नाही. आता साहित्यिकांनी परत केलेल्या पुरस्काराच्या रकमेचे काय करायचे, याचा निर्णय अकादमीने घ्यायचा आहे. यापूर्वी उदय प्रकाश, नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी, गणेश देवी यांच्यासह इतर काहींनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: To return seven more literary awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.