भेटवस्तू वापसीने राजकारण तापले
By admin | Published: March 23, 2016 03:34 AM2016-03-23T03:34:19+5:302016-03-23T03:34:19+5:30
बिहार विधिमंडळात सरकारी विभागांकडून वाटण्यात येत असलेल्या भेटवस्तूंचे जोरदार राजकारण सुरू आहे. सोमवारी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले भाजपचे
एस.पी. सिन्हा, पाटणा
बिहार विधिमंडळात सरकारी विभागांकडून वाटण्यात येत असलेल्या भेटवस्तूंचे जोरदार राजकारण सुरू आहे. सोमवारी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंगल पांडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांनी शिक्षण विभागासह अन्य विभागांकडून मिळालेल्या भेटवस्तू परत केल्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री राबडीदेवी प्रचंड भडकल्या. सुशीलकुमार मोदी यांनी ते सरकारमध्ये असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूसुद्धा परत करायला पाहिजे होत्या, असे टीकास्त्र सोडत त्यांनी लक्ष्य साधले. मोदी यांना जनतेची एवढीच चिंता होती तर त्यांनी या सर्व भेटी लोकांना वाटून दिल्या असत्या. परत करण्याची काय गरज होती, असा त्यांचा सवाल होता.
जर भेटवस्तू परत करायच्या होत्या तर सुशीलकुमार मोदी यांनी त्या स्वीकारायलाच नको होत्या, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे म्हणणे होते. या मुद्यावर राजकारण होऊ नये, असे सांगून ते म्हणाले की, मोदी सरकारमध्ये असताना त्यांचे मंत्रीसुद्धा भेटवस्तू देत असत.
मुळात माध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतरच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रेमकुमार आणि प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी शनिवारी संयुक्तपणे विभागांकडून मिळालेल्या भेटवस्तू परत करण्याची घोषणा केली होती.
विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दररोज विविध विभागांकडून आमदारांना भेटी देण्यात आल्या. शिक्षण विभागाने मायक्रोव्हेव दिले तर अन्य विभागांनी सुटकेस, मोबाईलसह अन्य काही वस्तू दिल्या.