‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वी रेव्ह पार्टीची तयारी!
By admin | Published: February 11, 2017 01:07 AM2017-02-11T01:07:48+5:302017-02-11T01:07:48+5:30
निवडणुकीच्या काळात भलेही पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असेल. पण, राजधानी दिल्लीत सध्या तरुणांच्या रेव्ह पार्टीची चर्चा जोरात आहे.
नितीन अग्रवाल , नवी दिल्ली
निवडणुकीच्या काळात भलेही पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असेल. पण, राजधानी दिल्लीत सध्या तरुणांच्या रेव्ह पार्टीची चर्चा जोरात आहे. ही रेव्ह पार्टीपेक्षा कमी नसेल आणि तरुणांना खुलेआम अंमली पदार्थ दिले जातील, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. या पार्टीला देण्यात आलेल्या नावातच लैंगिकतेचा अर्थ आहे. त्यामुळे त्यावर पोलिसांची करडी नजर असेल.
दरवर्षी व्हॅलंटाइन डेच्या निमित्ताने ठिकठिकाणी अशा पार्ट्या लपूनछपून होत असतात. मात्र त्या दिवशी त्या होत नाहीत. या पार्ट्या १४ फेब्रुवारीच्या आधी वा नंतर होतात. यंदाही रविवारी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी ती होणार असल्याचे उघड झाले आहे. अशा पार्ट्यांवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते आणि दिल्ली तसेच मुंबईच्या आसपास होणाऱ्या अनेक असल्या पार्ट्या पोलिसांनी यापूर्वी उधळून लावल्या आहेत.
पार्टीशी संबंधित आयोजकांनी दावा केला आहे की, ही दिल्लीतील तरुण-तरुणींची ही पहिली रेव्ह पार्टी असेल. आॅनलाइन पोर्न पुरविण्यासाठी बदनाम असलेल्या काही पोर्न साइट्समार्फत कमी वयातील तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही पोर्न स्टार सहभागी होणार असल्याचा दावाही आयोजक करत आहेत. मात्र ती शक्यता कमी आहे. दक्षिण दिल्लीच्या हौज खास भागात रविवारी दुपारी एक वाजल्यापासून या पार्टीची सुरुवात होणार आहे. या पार्टीत अश्लिलता मोठ्या प्रमाणावर असेल, असे संकेत आयोजकांनी दिले आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या आडून नेहमीच अशा पार्ट्या गुपचुप आयोजित केल्या जातात. पण, ही पहिलीच वेळ आहे की, खुले आम याचे आयोजन केले जात आहे. फेसबूक आणि अन्य सोशल साइट्सच्या माध्यमातून याची तिकीटे उघडपणे विकली जात आहेत. प्रवेश तिकीट १३०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे. या बदल्यात प्रवेशासोबत विदेशी मद्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांनी तर फेसबूकवरुनच सहभागी होत असल्याचे सांगून टाकले आहे. अर्थात, या पार्टीच्या आयोजनाबाबत फेसबुकवरून अनेकांनी यावर सवाल केला आहे. अशा प्रकारे आयोजन कसे होऊ शकते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.