‘नीट’बाबत राष्ट्रपतींना हवा खुलासा
By admin | Published: May 23, 2016 04:02 AM2016-05-23T04:02:08+5:302016-05-23T04:02:08+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) कक्षेतून राज्य परीक्षा मंडळांना बाहेर ठेवण्यास केंद्र सरकारने वटहुकुमाचा मार्ग अवलंबण्याच्या कारणांबाबत खुलासा करण्यासाठी आरोग्यमंत्री
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) कक्षेतून राज्य परीक्षा मंडळांना बाहेर ठेवण्यास केंद्र सरकारने वटहुकुमाचा मार्ग अवलंबण्याच्या कारणांबाबत खुलासा करण्यासाठी आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आज सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत.
विविध राज्यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात या वर्षापासूनच ‘नीट’ लागू करण्याचा आदेश दिला असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत वटहुकुमाचा पर्याय निवडला. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी संबंधित वटहुकुमाला मंजुरी दिली. मात्र यामुळे न्यायालयीन आदेशावर कुरघोडी केली होईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आरोग्य मंत्रालयाला त्यामागचे कारण विचारले असून, वटहुकुमाबाबत राष्ट्रपती भवनातील तज्ज्ञांचे मतही मागवले असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. मुखर्जी मंगळवारी चीनला जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
शासकीय जागांसाठी सवलत... राज्य सरकारच्या तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या जागाच नीटच्या कक्षेतून वगळण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून विविध खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना १२ ते १५ टक्के जागा दिल्या जातात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोटा पद्धतीचा लाभ मिळतो. १५पेक्षा जास्त राज्यांनी नीटला विरोध केला होता.