उलट गणती थांबवण्यात आली आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:21 AM2019-07-16T04:21:57+5:302019-07-16T04:22:19+5:30
चंद्रावर यान सोडून भारत सोमवारी नवा विश्वविक्रम स्थापन करणार होता.
- निनाद देशमुख
श्रीहरीकोटा : चंद्रावर यान सोडून भारत सोमवारी नवा विश्वविक्रम स्थापन करणार होता. त्यामुळेच या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो नजरा श्रीहरिकोटा येथील केंद्रावरील यानावर खिळल्या होत्या. उलट गणतीची टिकटिक शास्त्रांच्या हृदयाची धडधड वाढवत होती. तर माध्यमांचे प्रतिनिधी देखील डोळ््यात प्राण आणून प्रत्येक क्षण टिपण्यासाठी आतूर झाले होते. प्रत्यक्षात राष्ट्रपती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित असल्याने शास्त्रज्ञांमध्येही एक उत्साह आणि जोश होता. अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला असतानाच अचानक उलट गणती थांबवण्यात आली आणि सर्वांचाच हिरमोड झाला.
इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील वातावरण क्षणार्धात बदलून गेले. रात्री १२ वाजता नियंत्रण कक्षातून पहिली घोषणा झाली की यानाच्या सर्व गोष्टी नियंत्रणात असून सर्व सुरळीत आहे. रात्री एक वाजून ४० मिनिटांनी मोहीम प्रमुखांनी दुसरी घोषणा केली. काही कारणामुळे मोहीम थोड्या वेळासाठी थांबवण्यात आली. मात्र, सर्व ठीक होईल या आशेने सगळे उड्डाणाची वाट पाहत होते. प्रक्षेपणासाठी ५६ मिनिटे २४ सेकंद बाकी असताना तिसरी घोषणा झाली. प्रक्षेपात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण स्थगित करण्यात आले आहे. येत्या काळात सर्व त्रुटी दूर करून पुन्हा शास्त्रज्ञ मोहिमेसाठी सज्ज होतील, असा विश्वास शास्त्रज्ञांनी बोलून दाखवला. ‘चांद्रयान- २’ मोहिमेला याआधी दोन वेळा स्थगित करावे लागले होते. त्यामुळे यावेळी काहीही करून मोहीम यशस्वी होईलच, असा आत्मविश्वास शास्त्रज्ञांनाही होता. पण... मोहीम स्थगित झाल्याने निराशा झाली.
>माध्यम समन्वयकांना पत्रकारांचा गराडा
उड्डाण स्थगित झाल्याने त्यामागची कारणे शोधण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची लगबग सुरू होती. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रात काही वेळापूर्वी ऐतिहासिक क्षणाची सर्व माहिती दिली जात होती. मात्र, उड्डाण रद्द झाल्यावर कोणतीच माहिती दिली जात नव्हती. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी न बोलता उड्डाण स्थगित झाल्याचे ट्विट केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. इस्रोचे माध्यम समन्वयक गुरुप्रसाद यांना पत्रकारांनी गराडा घातला होता.
केंद्राच्या प्रवेश द्वाराजवळ जीएसएलव्ही आणि पीएसएलव्हीच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी हताश न होता या प्रतिकृतीसोबत छायाचित्र तसेच सेल्फी घेतली.