CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं चिंता वाढवली; पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेणार? अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 04:31 PM2021-11-27T16:31:18+5:302021-11-27T16:35:14+5:30
आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धुमाकूळ; जगभरातील देशांची झोप उडाली
नवी दिल्ली: आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलेल्या नवा व्हेरिएंट अतिशय वेगानं पसरत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे जगभरातील देशांची झोप उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील उठवण्यात आलेल्या निर्बंधांचा आढावा घेण्याचे आदेश मोदींनी दिले. त्यामुळे आता परदेशातून भारतात दाखल होत असलेल्या नागरिकांवर सरकारचं बारीक लक्ष असेल.
नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परदेशांमधून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 'हाय रिस्क' म्हणून घोषित केलेल्या देशांमधून येणाऱ्यांची कोविड चाचणी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोविड प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल पाळले जायला हवेत, असंही मोदी म्हणाले. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या व्हेरिएंटचा प्रभाव अधिक असलेल्या देशांमधून येणारी विमानं रोखण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या बैठकीला कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्याकडून मोदींनी देशातील स्थितीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या १५ डिसेंबरपासून कोरोना आधीच्या स्थितीत नेण्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयानं दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाली.
'ऍट रिस्क' देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, इस्रायल आणि हाँगकाँगचा समावेश ऍट रिस्क देशांच्या यादीत करण्यात आला आहे. नव्या व्हेरिएंटचा फैलाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपेंनी केली आहे. देशात कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी वेळेत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदी न केल्याबद्दल मोदी सरकारवर टीका झाली होती.