मोदी-शहांना मोठा धक्का; गुजरात भाजपामध्ये उघड बंड, 20 आमदार नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 11:19 AM2018-06-28T11:19:23+5:302018-06-28T11:25:26+5:30
गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा ही जोडी 'मिशन 2019'च्या तयारीला लागली असतानाच, गुजरात भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांचा रोख मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. आपणच नाही, तर 20 आमदार भाजपावर नाराज असल्याचा दावा या त्रिकुटाने केला आहे.
गुजरात म्हणजे भाजपाचा गड. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला. सरकारविरोधी वातावरण असतानाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजपाचं कमळ उमललं, यातच सगळं आलं. परंतु, मोदी-शहा दिल्लीत व्यग्र असताना त्यांच्या किल्ल्यात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्यात.
आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि त्यांना उत्तरदायी आहोत. परंतु, गुजरातमधील सरकारी अधिकारी आमचं म्हणणं ऐकतच नाहीत, अशी तक्रार आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी केली आहे. हे प्रकरण थेट दिल्ली दरबारी घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. परंतु, सरकारी बाबूंच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे आमदार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री रुपानी हे सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आमदारांनी हा मुद्दा उचलला, हे सूचक असल्याचं विश्लेषक सांगतात.
दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गुजरातला भेट दिली होती. 2019 च्या निवडणुकीबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या दौऱ्यानंतर लगेचच भाजपा आमदारांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे मोदी-शहांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.