बंडखोर शरद यादव आज करणार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:27 AM2017-08-17T04:27:20+5:302017-08-17T04:27:22+5:30
देशाची बहुविध समृद्धशाली पारंपरिक संस्कृती जतन करण्याची हाक देत समविचारी आणि भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकीची साद घातली आहे.
शीलेश शर्मा ।
नवी दिल्ली : नितीश कुमार यांना राजकीय सामर्थ्य दाखविण्यासाठी संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांनी देशाची बहुविध समृद्धशाली पारंपरिक संस्कृती जतन करण्याची हाक देत समविचारी आणि भाजपाविरोधी राजकीय पक्षांना एकीची साद घातली आहे. गुरुवारी त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात काँग्रेस आणि डाव्यांसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. एका अर्थाने हा कार्यक्रम म्हणजे शरद यादव यांचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.
काँग्रेस, सर्व डावे पक्ष, बसपा, तृणमूल काँग्रेससह भाजपाविरोधी अन्य राजकीय पक्षांचे नेत्यांना शरद यादव यांच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तेव्हा या सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहून भाजपाविरोधात एकजुटीचा प्रत्यय देतील, अशी अपेक्षा आहे. भाजपाविरोधातील सर्व पक्षांचे नेते निश्चित येतील, असा विश्वास शरद यादव यांनी या वेळी व्यक्त केला. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाºया या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका अर्थाने शरद यादव यांचे हे दिल्लीतील शक्तीप्रदर्शन आहे.
देशाची बहुविध संस्कृती हा राज्यघटनेचा आत्मा आहे. त्याच्याशी छेडछाड केली जात आहे. अशा सभा, बैठका देशभरात आयोजित केल्या जातील. या कार्यक्रमाचा निर्णय खूप अगोदर घेण्यात आला होता. ‘साझा विरासत बचाव संमेलन’ देशाच्या हिताचे आहे. सव्वाशे कोटीं भारतीयांच्या हिताचे आहे. पंतप्रधान मोदी धर्माच्या नावावरील हिंसाचाराविरुद्ध जरुर बोलतात; परंतु प्रत्यक्षात कृती दिसत नाही. भाजपाशासित राज्यांना त्यांनी त्यांच्या स्वत:च्या आदेशाचे पालन करण्यास मोदी यांनी सांगावे, अशी कोपरखळीही शरद यादव यांनी मारली. या वेळी त्यांच्यासोबत अली अन्वर अन्सारी, अरुण श्रीवास्तव हेही होते.