मांजर बेपत्ता झाली म्हणून कुटुंबाने सोडले जेवण; शोधून देणाऱ्यास मिळेल 10 हजाराचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:26 PM2022-04-01T18:26:47+5:302022-04-01T18:27:55+5:30
missing pet cat : जवळपास आठवडाभरापूर्वी लुसी नाव असलेली पाळीव मांजर बेपत्ता (Missing Pet Cat) झाली आहे.
लखनऊ : आपल्या देशात माणसांप्रमाणे प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. हे प्राणी प्रेमी (Pet animal) मुक्या जनावरांसाठी आधार असतात. अनेक प्राणी प्रेमी पाळीव प्राण्याला घरातला एक सदस्य मानतात. त्याला जीव लावतात. घरातल्या पाळीव प्राण्याचे सर्व लाड पुरवण्यापासून ते त्याच्या आजारपणापर्यंतची सर्व काळजी घेतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथील मोहम्मद ताहिर यांच्या कुटुंबाच्या प्राणी प्रेमाची परिसरात चर्चा सुरु आहे.
प्रयागराजमधील मोहम्मद ताहिर यांची पाळीव मांजर हरवल्यानंतर त्यांचे कुटुंबीय नाराज झाले आहेत. जवळपास आठवडाभरापूर्वी लुसी नाव असलेली पाळीव मांजर बेपत्ता (Missing Pet Cat) झाली आहे. ही लुसी मांजर बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून मोहम्मद ताहिर यांच्या कुटुंबातील काही सदस्य सतत रडत आहेत तर काहींनी जेवण करणे बंद केले आहे. तसेच, कुटुंबाने आता त्यांची लुसी परत आणणाऱ्याला 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कुटुंबाने ते राहत असलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरातील भिंती, विजेचे खांब आणि मार्केटमध्ये लुसीचे पोस्टरही लावले आहेत.
मोहम्मद ताहिर यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी आम्ही लुसीला आमच्या घरी आणले होते. ती आमच्या मुलासारखी होती आणि आमच्याबरोबर जेवायची आणि झोपायची. आता ती बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य चिंतेत आहे. त्यामुळे आता तिचा शोध घेण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या चित्रांसह पोस्टरवर अवलंबून आहेत. आम्ही बक्षीस देऊ केले आहे, जेणेकरून कोणी चोरले असेल तर तो ते परत करू शकेल आणि पैसे घेऊ शकेल.