"पोलीस आम्हाला लपवा म्हणत होते"; नर्सने सांगितला हॉस्पिटलमधील अंगावर काटा आणणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 04:43 PM2024-08-15T16:43:49+5:302024-08-15T16:45:31+5:30
कोलकाता येथे डॉक्टरच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवला जात असताना काही अज्ञातांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
Kolkata Hospital Mob Horror : कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर संजय रॉयला अटक केली आहे. या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. मात्र बुधवारी रात्री या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. रात्री उशिरा अज्ञातांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तोडफोड केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ मध्यरात्री ही तोडफोड झाल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी फेसबुकवर दंगलखोरांचा फोटो शेअर केली आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांकडून माहिती मागवली आहे. दुसरीकडे, तोडफोड करणारे एवढे आक्रमक झाले होते की पोलिसांवर लपून राहण्याची वेळ आली.
आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीदरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. शेकडो लोकांचा जमाव हॉस्पिटलमध्ये कसा घुसला, गोंधळ घातला आणि डॉक्टरांना लक्ष्य कसे केले, हे या व्हिडिओंमध्ये दिसून आले. ४० लोकांचा एक गट हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दंगलखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या भीषण बलात्कार आणि हत्येनतर रुग्णालयात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या परिचारिकांकडे आश्रय घेतला. एका नर्सने सांगितले की, "पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या भडकलेल्या जमापेक्षा कमी होती. त्यामुळे पोलिसांनी आमच्याकडे सुरक्षा मागितली. ड्युटीवर असलेले दोन अधिकाऱ्यांनी कृपया आम्हाला तुमच्या वॉर्डात लपवा, असं म्हटलं."
नर्सच्या म्हणण्यानुसार, जमावाचा रोष त्या सेमिनार रूमवर होता जिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. त्यांना सेमिनार रूममध्ये प्रवेश करायचा होता. त्यांचे मुख्य लक्ष्य सेमिनार रुम होती. त्यांनी तिसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला पण ते जाऊ शकले नाहीत. त्यांनी दुसरा मजला उद्ध्वस्त केला. त्यांना वाटले असेल की हा तो मजला आहे जिथे डॉक्टरची हत्या झाली.
दरम्यान, बुधवारी रात्री ११.५५ वाजता 'रिक्लेम द नाईट' मोहिमेअंतर्गत राज्यभरात निदर्शने सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेला वेग आला, कोलकातामधील अनेक ऐतिहासिक स्थळांसह लहान शहरे आणि मोठ्या शहरातील प्रमुख भागात हे आंदोलन पसरले होते.