दरवाढीचा डोस 509 औषधे महाग
By admin | Published: April 9, 2015 04:39 AM2015-04-09T04:39:15+5:302015-04-09T04:39:15+5:30
साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड
नवी दिल्ली : साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड रुपयापासून कमाल १,६०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली असून, नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत.
या अचानक औषध दरवाढीमागचे कारण मात्र कच्चा मालातील वाढ अथवा संशोधन खर्चातील वाढ हे नसून, याचा संबंध थेट महागाईशी जोडला गेला आहे. देशामध्ये महागाई मोजण्यासाठी आधार घेण्यात येणाऱ्या घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांकाशी औषधांच्या किमती जोडण्यात आल्या असून, या निर्देशांकात वर्षाखेरीस होणाऱ्या हालचालींचे प्रतिबिंब औषधांच्या किमतीवर पडणार आहे. टक्केवारीत ही वाढ ३.८४ टक्के इतकी किरकोळ दिसत असली तरी मधुमेह, कर्करोग आणि कावीळ या आणि यासारख्या काही आजारांवरील औषधांच्या किमती आताच महाग असल्याने त्यावर ही नवी आकारणी होणार असल्याने यांच्या किमतीत अधिक वाढ होईल. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार, २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांक ३.८४ टक्क्यांनी वाढला आहे. त्यानुसार नवी आकारणी करण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)