भारताभोवतीच्या समुद्रांत मिळाले अमाप खनिजसाठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:24 AM2017-07-18T03:24:36+5:302017-07-18T03:24:36+5:30
भारतीय व्दिपकल्पाच्या सभोवताली असलेल्या समुद्रांच्या तळाशी लाखो टन बहुमोल खनिजांचे साठे असल्याचे आढळून आले आहे. हाती आलेली माहिती
कोलकाता : भारतीय व्दिपकल्पाच्या सभोवताली असलेल्या समुद्रांच्या तळाशी लाखो टन बहुमोल खनिजांचे साठे असल्याचे आढळून आले आहे. हाती आलेली माहिती प्राथमिक असून अधिक खोलवर याहूनही मोठे खनिजसाठे दडलेले असण्याची शक्यता आहे.
भारतीय भूगभर्विज्ञान सर्वेक्षण विभागाने (जिओलॉजिकल सव्हे आॅफ इंडिया-जीएसआय) गेली तीन वर्षे समुद्रकिनाऱ्यापासून आत २०० किमी पर्यंत असलेल्या भारताच्या ‘विशेष अर्थिक क्षेत्रात’ केलेल्या सर्वेक्षणांत या अमाप सागरी खनिजसंपत्तीची तोंडओळख झाली आहे.
या तीन वर्षांत ‘जीएसआय’ने ‘समुद्र रत्नाकर’, ‘समुद्र कौस्तुभ’ आणि ‘समुद्र सौदिकम’ या अत्याधुनिक सर्वेक्षण जहाजांच्या मदतीने १,८१, ०२५ चौ. किमी सागरतळाच्या सुस्पष्ट प्रतिमा घेऊन या संभाव्य खनिजसाठ्यांची बहुमोल माहिती गोळा केली आहे. ही माहिती फक्त सागरतळाच्या पृष्ठभागाची आहे. या तळाच्या खाली आणखी खोलवर उत्खनन केल्यास याहूनही मोठे खनिजसाठे असावेत याचे हे द्योतक मानले जात आहे.
सन २०१४ मध्ये मंगळुरु, चेन्नई, केरळमधील मन्नारचे आखात, अंदमान आणि निकोबार बेटे व लक्षद्वीप बेटे यालगतच्या समुद्रात या खनिजसाठ्यांचा सर्वप्रथम शोध लागला होता. त्यानंतर अधिक मोठ्या क्षेत्राचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. यात चुनखडीयुक्त माती, फॉस्फेट आणि कॅल्शियमसमृद्ध गाळ, हायड्रोकार्बन, लोहखनिज आणि खनिजयुक्त खडे यांचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळून आले. यापैकी चुनखडीयुक्त मातीचे साठे भारताच्या संपूर्ण विशेष आर्थिक क्षेत्रात विखुरलेले असून ते १० हजार दशलक्ष टन असावेत, असा अंदाज आहे.
कुठे काय सापडले?
फॉस्फेटयुक्त गाळ : कारवार, मंगळुरु-चेन्नईनजिक
गॅस हायट्रेट : मन्नारचे आखात, अळापुळा, केरळ
कोबाल्टयुक्त लोह : मँगनीज चुरा- अंदमान समुद्र
मँगनीजयुक्त लघुगड : लक्षद्वीपभोवतीचा समुुद्र
चुनखडीयुक्त माती : संपूर्ण विशेष आर्थिक क्षेत्र
जेथून खनिजांचे उत्खनन केले जाऊ शकेल असे भाग शोधणे व सागरतळाशी किती खनिजसंपत्ती असू शकेल याचा अंदाज घेणे या उद्देशाने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.
- आशीश नाथ, अधीक्षक भूगर्भवैज्ञानिक, जीएसआय