तेल मंत्रालयातील हेरगिरीने राष्ट्रहितही धोक्यात

By admin | Published: February 22, 2015 12:09 AM2015-02-22T00:09:22+5:302015-02-22T00:09:22+5:30

तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे.

Rigging of oil ministry threatens national interest | तेल मंत्रालयातील हेरगिरीने राष्ट्रहितही धोक्यात

तेल मंत्रालयातील हेरगिरीने राष्ट्रहितही धोक्यात

Next

नवी दिल्ली : तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह १२ आरोपींवर शासकीय गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असा दावा दिल्ली पोलिसांनी शनिवारी स्थानिक न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने अटकेतील पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हेरगिरी प्रकरणाच्या तपासाला गती देत अटकेत असलेला ऊर्जा सल्लागार प्रयास जैन याच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर नोएडामधील एका पेट्रोकेमिकल कंपनीच्या कार्यालयावरही शनिवारी धाड घातली.
पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खनगवाल यांच्यासमक्ष हजर करून त्यांची कसून चौकशी करण्याच्या दृष्टीने पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या चौकशीसाठी संबंधित मंत्रालयांशीही संपर्क करावा लागणार आहे. समोरासमोर बसवून जाबजबाबासाठी त्यांची कोठडी मिळणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
यावर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाचही आरोपींना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली.
धाडसत्र
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युबिलंट एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी सुभाष चंद्रा यांना सकाळी प्रयास जैनच्या कार्यालयात नेण्यात आले. चंद्रा यांना शुक्रवारी ऊर्जा कंपन्यांच्या इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अटक करण्यात आली होती. जैनच्या कार्यालयाची झाडझडती घेतल्यानंतर पोलीस त्याला ज्युबिलंट एनर्जीच्या नोएडास्थित कार्यालयात घेऊन गेले. या ठिकाणी चोरीच्या दस्तऐवजांचा शोध घेण्यात आला.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांची झाडाझडती आम्ही घेतली असून, अजूनही काही ठिकाणी धाडी घातल्या जाण्याची शक्यता आहे. कारण आम्हाला या हेरगिरी प्रकरणाच्या तळापर्यंत जायचे आहे.
गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केलेल्या पाच जणांमध्ये आयआरएलचे शैलेश सक्सेना, एस्सारचे विनयकुमार, केयर्सचे के.के. नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे सुभाष चंद्रा आणि एडीएजी रिलायन्सचे ऋषी आनंद यांचा समावेश आहे.
ही हेरगिरी केव्हापासून सुरू आहे आणि आतापर्यंत किती लोकांना याचा फायदा झाला आहे हे जाणून घेणे आमच्यासाठी गरजेचे आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कंपन्यांचे हे सर्व अधिकारी चोरीचे दस्तऐवज मिळवीत होते. त्यांच्या कार्यालयांमधील धाडीत हे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
सक्सेना हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये व्यवस्थापक (कॉर्पोरेट) आहेत, तर ऋषी आनंद हे रिलायन्स एडीजीमध्ये उपमहाव्यवस्थापक आहेत. या अधिकाऱ्यांविरुद्ध भादंविचे कलम १२०-ब (गुन्हेगारी कट) आणि कलम ४११ (अवैधरीत्या चोरीची संपत्ती प्राप्त करणे) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोपनीय दस्तऐवजांच्या चोरीचे हे प्रकरण पेट्रोलियम मंत्रालयापर्यंतच मर्यादित असेल असा समज होता. परंतु प्रत्यक्षात याचे तार अर्थ, कोळसा आणि ऊर्जा मंत्रालयाशीही जोडल्या गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४नवी दिल्ली : कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणातील एक मुख्य आरोपी माजी पत्रकार शांतनू सैकिया याने हा घोटाळा १०,००० कोटी रुपयांचा असल्याचा दावा केला आहे.
४स्वत:चे एक पोर्टल वेब चालविणाऱ्या सैकियाने गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना उपरोक्त दावा केला. याबाबत आणखी खुलासा करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु पोलीस जाबजबाबासाठी त्याला आत घेऊन गेले.
४दरम्यान आपला बचाव करण्यासाठी सैकिया हा दावा करीत असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. त्यांच्याजवळ जी काही माहिती आहे ती त्यांना देऊ द्या. कोणीतरी मंत्रालयातील दस्तावेज चोरले असा प्राथमिक आरोप असून पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Rigging of oil ministry threatens national interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.