लिव्ह इन रिलेशनमधून होणाऱ्या मुलांना पोटगी मिळविण्याचा अधिकार-पंजाब हायकोर्ट
By admin | Published: July 1, 2017 02:00 PM2017-07-01T14:00:22+5:302017-07-01T14:08:33+5:30
लिव्ह इन रिलेशनमधून होणाऱ्या मुलांना पोटगीचा हक्क असल्याचं पंजाब हायकोर्टाने म्हंटलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 1- "लिव्ह इन रिलेशन ही असाधारण गोष्ट नाही. या रिलेशनशिपमधून होणाऱ्या मुलांनासुद्धा विवाहीत दांपत्याकडून होणाऱ्या मुलांप्रमाणे पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब व हरियाणा हायकोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या म्हणण्यानूसार, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलासुद्धा पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे.
गुरूग्राममध्ये एक जोडपं 2007 सालापासून लिव इन रिलेशनमध्ये राहत होतं. त्यांना 2011 मध्ये एक मुलगा झाला. या प्रकरणातील महिलेने तिच्या जोडीदारावर आरोप केला आहे. आपण घटस्फोटीत असल्याचं त्या महिलेच्या प्रियकराने सांगितलं होतं. तसंच याचिकाकर्त्या महिलेशी लग्न करणार असल्याचंही त्यांने सांगितलं होतं. महिलेला वचन दिल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर लग्नाचं वचन देणाऱ्या तिच्या प्रियकराने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्याचं समजलं.
लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्या माणसाने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्या महिलेच्या लक्षात आलं. नंतर तिने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने लिव इन रिलेशन असाधारण नसल्याचं सांगितलं. तसंच लिव्ह इनमधून होणाऱ्या मुलाला पोटगी मिळविण्याचा अधिकार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. या सुनावणी दरम्यान कोर्टाने लिव्ह इनमधून झालेल्या मुलाला दहा हजार रूपये तर त्या महिलेला 20 हजार रूपये पोटगी दिली जावी, असा निर्णय दिला. या प्रकरणातील पुरूषाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देत आपलं लग्न झालं आहे हे महिलेला माहिती असल्याचं कोर्टाला सांगितलं. तसंच ती महिला मोठी रक्कम घेऊन वेगळी झाली आहे, त्यामुळे आता पोटगीसाठीची रक्कम रद्द करावी, अशी मागणीही त्याने केली.
पंजाब हायकोर्टाने पोटगी संबंधातील कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवलं आहे. "आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनचे नातेसंबंध स्वीकारले जात आहेत. समाजात बदलही येतो आहे. त्यामुळे पोटगी मिळविण्याचा अधिकार लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेला आणि तिच्या मुलाला मिळायला हवा", असं न्यायमूर्ती जयश्री ठाकूर यांनी सांगितलं आहे.