सध्या तरी अखिलेशच मुख्यमंत्री - मुलायमसिंह
By admin | Published: October 25, 2016 03:40 PM2016-10-25T15:40:15+5:302016-10-25T16:00:45+5:30
सध्या अखिलेश यादव मुख्यमंत्रीपदावर आहेत. मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्यास नव्या मुख्यमंत्र्याची निवड आमदार करतील, असे मुलायम यांनी सांगितले.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 25 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच समाजवादी पक्षामध्ये यादवी माजली आहे. सपा प्रमुख मुलायम सिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील बेबनाव हे सर्वांच्या चर्चेचे कारण ठरलेले असतानाच आज मुलायमसिंह यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष व परिवारात एकी असल्याचे नमूद करतानाच ' अखिलेश यादव हेच सध्या मुख्यमंत्रीपदी कायम 'असल्याचेही स्पष्ट केले.
मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण हे आमदारच ठरवतील असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडल्याचे चित्र दिसत आहे. समाजवादी पक्षात तीव्र झालेल्या वर्चस्वाच्या लढाईंमुळे पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांच्या मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र मुलायम सिंह यांनी पक्ष व यादव परिवारात एकी असल्याचे नमूद करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच अखिलेश अद्यापही मुख्यमंत्रीपदी असून मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्यांच्यावरून या वादाची सुरूवात झाली ते शिवपाल यादव व सर्व बरखास्त मंत्री बैठकीला उपस्थित होते मात्र अखिलेश यादव अनुपस्थित राहिल्याने पक्षात अद्यापही सारे काही आलबेल नसल्याचेच संकेत मिळत आहेत.