घराणेशाहीवरून मोदींनी दिला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कठोर संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 05:30 AM2019-03-25T05:30:55+5:302019-03-25T05:35:02+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घराणेशाहीवरून कठोर संदेश देते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला तीव्र विरोध केला.
शुक्रवारी रात्री भाजपाच्या मुख्यालयात मध्य प्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी मध्य प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीतच मोदी यांनी परिवारवादाला प्रोत्साहन देण्याच्या प्रवृत्तीवरून खडसावले. या बैठकीत कैलाश विजयवर्गीय यांचा थेट उल्लेख करून ते म्हणाले की, तुम्ही मुलाच्या उमेदवारीसाठी कसे डाव खेळलात, हे मी विसरू शकत नाही. तुमच्या या कृतीने मी कमालीचा नाराज आहे, असे खडे बोल सुनावले.
मोदी यांच्या परखड बोलाने भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शांतता पसरली. या बैठकीला भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, गोपाल भार्गव आणि मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मध्य प्रदेशातील आपली विधानसभेची जागा आपल्या मुलासाठी कैलाश विजयवर्गीय यांनी सोडल्याचा विषय तसा जुनाच आहे. त्यांच्या मुलाला विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते आणि ते विजयीही झाले; परंतु लोकसभेसाठी उमेदवार निवडण्यासाठी मध्य प्रदेशातील भाजपाचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी हा चार महिन्यांपूर्वीचा मुद्दा उपस्थित करून घराणेशाहीला तीव्र विरोध केला.
शिवराज सिंह चौहान हेही आपल्या पत्नीला विदिशाची उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान मोदी नाराज झाले.
एकदाचा अध्याय बंद
विजयवर्गीय हे पक्षश्रेष्ठींचे निकटवर्ती मानले जातात. इंदूर लोकसभेच्या जागेसाठी आपणास उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. सुमित्रा महाजन यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली असल्याने या जागेसाठी आपण स्वत: इच्छुक आहोत, असा त्यांनी भरबैठकीत या जागेवार स्वत:चा दावा केला होता. तथापि, पंतप्रधानांनी परिवारवादावर उघड नाराजी व्यक्त करून विजयवर्गीय यांचा अध्यायच बंद करून टाकला. कुटुंबातील सदस्य वा नातेवाइकांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या अन्य नेत्यांचीही स्वप्नेही धुळीस मिळाली.