रिओ ऑलिम्पिक खेळाडू जैशाला स्वाईन फ्लूची लागण
By Admin | Published: August 26, 2016 08:01 AM2016-08-26T08:01:06+5:302016-08-26T08:01:06+5:30
भारताची धावपटू ओ.पी. जैशाला स्वाईन फ्लूची लागण झाली असून बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे
>- ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 26 - रिओ ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी व एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नसल्याचे आरोप केल्याने चर्चेत आलेली भारताची धावपटू ओ.पी. जैशाला स्वाईन फ्लू झाला आहे. जैशाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये स्वाईन फ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बंगळुरुमधील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.
जैशाची तब्बेत चांगली असून तिला निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती डॉक्टर एस आर सरला यांनी दिली आहे. रिओ ऑलिम्पिकदरम्यान जैशासोबत एकाच खोलीत राहणा-या सुधा सिंगलादेखील स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. तिलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जैशा आणि कविता राऊतसोबत राहिलेल्यांना स्वाईन फ्लूची लक्षणं दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
स्टीपलचेस अॅथलीट सुधा सिंगला झिका व्हायरसची लागण झाली असल्याचा संशय असल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. सुधासिंगने रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेतला होता. सुधा सिंग व्यतिरिक्त धावपटू कविता राऊतची रुग्णालयात नाशिक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर रक्ताचेही नमुने घेण्यात आले होते. ब्राझिलच्या उच्च आयुक्तांकडून देण्यात आलेल्या आदेशांनुसार खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी करण्यात येत होती.