Delhi Violence: दंगेखोरांनी छातीवर रोखली पिस्तूल, तरीही मागे हटला नाही पोलीस कॉन्स्टेबल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:10 AM2020-02-25T10:10:21+5:302020-02-25T11:11:30+5:30
Delhi Violence News : राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले.
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले असतानाच राजधानी दिल्लीत सीएए आणि एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या हिसाचारात आतापर्यंत पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी भडकलेल्या दंगलीची काही छायाचित्रे आता व्हायरल होऊ लागली आहेत. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न करत होते. त्याचदरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले. मात्र एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही संबंधित पोलीस कॉन्स्टेबल एक पाऊलही मागे हटला नाही.
दिल्लीतील मौजपूर नहर रोडवरील सेठ भगवानदास स्कूलसमोर दंगेखोरांनी दुकानांना आग लावली. गाद्यांच्या दुकानांना आग लावल्यावर हा दंगेखोर जमाव जाफराबादच्या दिशेने घोंडाचौककडे निघाला. त्या दरम्यान, दोन्हीकडून दगडफेक सुरू होती. यादरम्यान, पोलिसांनी दंगेखोरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र एका तरुणाने थेट पिस्तूल बाहेर काढले. एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही. त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले होते. मात्र संबंधित पोलीस कॉन्स्टेबल अजिबात मागे हटला नाही.
An anti-CAA protester open fire in #Jaffarabad area. He pointed pistol at policeman but the cop stood firm. He fired around eight rounds. @DelhiPolicepic.twitter.com/0EOgkC6D40
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) February 24, 2020
नंतर त्याने चार ते पाचवेळा गोळीबार केला. दरम्यान, काहीवेळाने हाच तरुण भिंतीआड लपून गोळीबार करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या तरुणाचे नाव मोहम्मद शाहरूख असून तो जाफराबाजमध्ये राहणारा असल्याचे निष्पन्न झाले.
सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जाफराबादमधील जमाव घोंडा चौकाच्या दिशेने गोळीबार करत जात होता. या जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. दरम्यान, पोलिस जमावाला रोखण्यासाठी पुढे सरसावल्यावर एक तरुण पिस्तूल उंचावत समोर आला. तो सतत गोळीबार करत होता.
दरम्यान, दंगेखोरांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. अनेक दंगेखोर पिस्तूल घेऊन फिरत होते. काही ठिकाणी लोक घरातूनही गोळीबार करत होते, असा दावा पोलिसांनी केला.
संबंधित बातम्या