पर्रिकरांमुळे राज्यसभेत ‘दंगल’
By admin | Published: August 2, 2016 04:32 AM2016-08-02T04:32:12+5:302016-08-02T04:32:12+5:30
पर्रिकरांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळयात नव्याने वादग्रस्त विधाने करून राजधानीत नवी ‘दंगल’ घडवली.
सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- अभिनेता आमिरखानने ८ महिन्यांपूर्वी असहिष्णुतेच्या संदर्भात जे विधान एका सार्वजनिक कार्यक्रमात केले त्याचा समाचार घेताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळयात नव्याने वादग्रस्त विधाने करून राजधानीत नवी ‘दंगल’ घडवली.
राज्यसभेत पर्रिकरांच्या ‘त्या’ विधानांचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. उपसभापती कुरियन यांच्या हस्तक्षेपाला न जुमानता सिताराम येचुरी, गुलाम नबी आझाद, मायावती आदींनी संरक्षणमंत्र्याची थेट हजेरी घेतली.
काहीशा बचावात्मक पवित्र्यात पर्रिकर म्हणाले, ‘मी कोणाचे नाव घेतले नव्हते आणि कोणालाही धमकावलेही नाही. मोघम आरोपांऐवजी मी नेमके काय बोललो, त्याची चित्रफित सदस्यांनी पहावी आणि मगच कोणत्याही निर्णयाप्रत यावे’
आमिरखान संदर्भात पुण्यात पर्रिकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या विरोधात राजधानीत रविवारपासून तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया व त्याचे साद पडसाद उमटत आहेत.
शून्य प्रहरात सोमवारी
राज्यसभेत हा विषय उपस्थित
झाला तेव्हा पर्रिकर स्वत: सभागृहात उपस्थित होते. त्यांना उद्देशून
माकपचे सिताराम येचुरी म्हणाले, ‘देशात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांवर असते. पर्रिकर त्याऐवजी अल्पसंख्यांकांच्या मनात भीती
आणि धाकदपटशा चा माहोल निर्माण करीत आहेत.’
येचुरीं पाठोपाठ गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘अल्पसंख्य समुदायाला पर्रिकर कोणता धडा शिकवू इच्छितात, ते साऱ्या देशाला कळले पाहिजे.’
मायावती म्हणाल्या, भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्य विशेषत: मुस्लीम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट
बनवले जात आहे. वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांवर पंतप्रधान मोदी कारवाई का करीत नाहीत, याचे स्पष्टीकरण त्यांंनी स्वत: या सभागृहात येउन दिले पाहिजे.
पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळयात आमिरखानचे नाव न
घेता संरक्षणमंत्री पर्रिकर म्हणाले, ‘एक अभिनेता म्हणाला की त्याच्या
पत्नीला हा देश सोडून परदेशात जावेसे वाटते. त्याच्या या विधानात अहंकार भरलेला आहे. मी गरीब असेन, माझे घर लहान असेल, तरी त्या घरावर मी प्रेम करीन. छोट्या घराऐवजी मोठे घर बनवण्याचे स्वप्न पाहिन, मात्र मातृभूमीचा त्याग करण्याचा विचार कधी करणार नाही. काही लोक देशाच्या विरोधात बोलण्याचे
धाडस करतात. जे लोक असे बोलतात, त्यांना देशातल्या जनतेने धडा शिकवला पाहिजे’.
>राजकीय वर्तुळातही उमटले तीव्र पडसाद
पर्रिकरांच्या विधानाचे गंभीर पडसाद राज्यसभेतच नव्हे तर राजधानीच्या राजकीय वर्तुळातही उमटले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पर्रिकरांच्या विधानाचा समाचार घेतांना रविवारी व्टीट केले की ‘रा.स्व.संघ आणि पर्रिकर देशात सर्वांनाच धडा शिकवू इच्छितात. भित्रे लोक नेहमीच इतरांचा व्देष करतात मात्र ते कधी जिंकत नाहीत.’
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, संरक्षणमंत्री या नात्याने पाकशी दोन हात करण्याचे काम पर्रिकरांवर सरकारने सोपवले आहे. ते काम करण्याऐवजी आमिरखान सारख्या अभिनेत्याला धमकवण्याचे काम ते करीत आहेत.त्यांंच्या विधानावरून एक बाब षपष्टपणे सामोरी येते की या देशात दलित आणि अल्पसंख्यांकांना चिरडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे.