‘तेजस्वी’ ताऱ्याचा उदय, तरुण नेत्याने गाजवून सोडले बिहारचे रणांगण; प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत छाप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 01:07 AM2020-11-11T01:07:22+5:302020-11-11T07:01:58+5:30
तेजस्वी यांचा क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास आहे.
नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या रणधुमाळीत दिग्गज नेत्यांना ३१ वर्षांचा तरुण नेता पुरुन उरला. हा तरुण नेता आहे तेजस्वी यादव. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचा नेता. प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत सर्वत्र तेजस्वी यादव यांनी छाप सोडली.
तेजस्वी यांचा क्रिकेटपटू ते राजकारणी असा प्रवास आहे. ही निवडणूक त्यांनीच खऱ्या अर्थाने गाजविली. त्यांना त्यात प्रत्यक्ष अनुभव कमी. वडील तुरुंगात. तरीही निराश न होता जिद्दीने तो मैदानात उतरला. मतदारसंघाची बांधणी करण्याचे काम हळूहळू सुरुच होते. त्यानंतर डावपेच आखून तिकीटवाटप केले. त्यांनी प्रचारात सुरुवातीला असलेली भाजपची हवाच पूर्णपणे काढून घेतली. त्यांच्या सभांना गर्दी व्हायला लागली व तेजस्वी यांची सर्वत्र चर्चा सुरु झाली.
जेडीयुचे नेते नितीशकुमार हे स्वत: चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी मैदानात उतरले. अखेरच्या प्रचारसभेत त्यांनी यंदाची निवडणूक अखेरची असल्याचे वक्तव्य केले. प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्यापासून भाजपचे दिग्गज नेते उतरले होते. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी मोठी होती. या सर्वांना तेजस्वी यांनी तगडे आव्हान दिले. तरीही प्रचारामध्ये तेजस्वी यांनीच भाव खाल्ला.
एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान दिले. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल, मंगलराज सुरू होईल. ज्याप्रमाणे ते लढत आहेत, हा एक चांगला संकेत असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
वडील व बराच काळ मुख्यमंत्री असलेले लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात तुरुंगामध्ये, आईही माजी मुख्यमंत्री, पण प्रचारासाठी तिचा उपयोग नाही, मोठा भाऊ तेजप्रताप अत्यंत विक्षिप्त. बहीण मिसामुळे मते कमी होण्याची शक्यता असल्याने तिला प्रचारापासून दूर ठेवले. सारा भार एकट्या तेजस्वीनेच उचलला. लालूंच्या नावाने मते मागितली नाहीत आणि जातीची समीकरणे केली नाहीत. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा हेच मुद्दे मांडून नितीश कुमार व भाजपपुढील अडचणी वाढवण्याचे प्रयत्न केले प्रचारात त्यांनी लोकांच्या मनातले मुद्दे घेतले. जेव्हा त्यांनी १० लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन दिले, तरुणांनी त्यांना प्रतिसाद दिला. आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न असेल, त्यांनी मतदारांच्या वर्मावर बोट ठेवले.