टोमॅटो महागलाय, मग वापरा टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचअप !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 04:12 PM2017-08-01T16:12:07+5:302017-08-01T16:21:20+5:30
टोमॅटोची जेवणातील चव राखण्यासाठी टोमॅटो केचअप, टोमॅटो प्युरी आणि सॉस इत्यादी उत्पादनांचा वापर करता येऊ शकतो.
नवी दिल्ली, दि. 1 - गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकगृहातून टोमॅटो हद्दपार झालाय. जेवणात महत्त्वाचं स्थान असलेल्या टोमॅटोच्या चवीपासून अनेकांना वंचित राहावं लागतंय. मात्र टोमॅटो महागला तरी तुम्ही घाबरू नका, टोमॅटोची जेवणातील चव राखण्यासाठी टोमॅटो केचअप, टोमॅटो प्युरी आणि सॉस इत्यादी उत्पादनांचा वापर करता येऊ शकतो.
तसेच टोमॅटो महागल्यामुळे या उत्पादनांची बाजारातील मागणीही वाढली असून, 40 ते 45 टक्क्यांवर गेली आहे. टोमॅटो महागल्यामुळे जवळपास 70 टक्के मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बिघडलाय, अशी माहिती असोचेमने दिली आहे. टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचअपची वाढती मागणी पाहता दुकानदारांनीही त्याचा साठा वाढवला आहे. जास्त करून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा वापर केला जात होता. त्यामुळेच हॉटेल आणि रेस्टारंटमध्ये जाणा-या खवय्यांना पदार्थांत टोमॅटोची चव मिळावी, म्हणूनही केचअपचा वापर केला जातोय. त्याप्रमाणेच काही गृहिणींनी टोमॅटोचा वापर कमी केलाय. टोमॅटोची गरज नसलेल्या भाज्या म्हणजे भेंडी, भोपळा, पालेभाज्या करण्यावर गृहिणींनी जास्त भर दिला आहे.
मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबादसारख्या शहरांसह वाढलेल्या किमतीचा मोठा परिणाम हा राजधानी दिल्लीत व त्यानंतर अहमदाबादेत दिसला. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले होते, ‘पाहणीत कमी उत्पन्न गटातील 70 टक्के कुटुंबांनी टोमॅटोचा वापर बंद करून खर्च टाळला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे टोमॅटोची चटणी, केचअप, आले व लसणाची पेस्ट आदी तयार पदार्थांच्या मागणीत 40-45 टक्के वाढ झाली आहे.’
दिल्लीसह अनेक बाजारांत टोमॅटोनं शंभरी पार केली आहे. देशाच्या प्रमुख शहरांत महिन्याभरापूर्वी 30 रुपये किलोनं मिळणारा टोमॅटो 100पार गेला आहे.